BULDHANAHead linesVidharbha

शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना धान्याऐवजी आता रोख रक्कम!

– अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा आदेश निघाला

बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्यातील बुलढाणा जिल्ह्यासह शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना धान्याऐवजी आता प्रतिलाभार्थी १५० रुपयांप्रमाणे रोख रक्कम गेल्या महिन्यापासून म्हणजेच जानेवारी २०२३ पासून देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला असून, तसा आदेश २८ फेब्रुवारीरोजी जारी झालेला आहे.

अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या जुलै २०१५ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील बुलढाणा, अकोला, जालना, नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबाद, बीड़, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, यवतमाळ व वर्धा अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समावेश नसलेल्या केशरी (एपीएल) शिधापत्रिकाधारक शेतकर्‍यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान २०१३ अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे प्रतिमाह व प्रति सदस्य ५ किलो अन्नधान्य ज्यामध्ये गव्हू प्रतिकिलो २ रू. व तांदूळ प्रतिकिलो ३ रुपये दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. या योजनेसाठी अवश्यक अन्नधान्याची खरेदी केन्द्र सरकारच्या (Non NFSA) योजनेंतर्गत गहू २२ रुपये व तांदूळ २३ रुपये प्रतिकिलो दराने करण्यात येत होती. मात्र सदर योजनेंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंड़ळाने यापूर्वी कळविले आहे. त्यामुळे केशरी (एपीएल) शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्याना माहे जानेवारी २०२३ पासून अन्न धान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी १५० रुपये रोखीने देणार असून, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अवर सचिव पूजा मानकर यांनी २८ फेब्रुवारी रोजी  काढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!