कर्जत (प्रतिनिधी) – आगामी काळात येणार्या अडचणीना तोंड देऊ शकणारी शिक्षण पद्धती युवकांना देण्याची गरज असून, त्यादृष्टीने शिक्षण क्षेत्राला काम करावे लागेल, असे म्हणत यासाठी जगातील तीन मोठ्या संस्थांशी करार करण्यात आला असल्याचे प्रतिपादन खा. शरद पवार यांनी कर्जत येथे केले. रयत शिक्षण संस्थेच्या कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात नव्याने उभारलेल्या शारदाबाई पवार सभागृहाचे उद्घाटन पद्मभूषण खा. शरद पवार यांच्याहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी पवार बोलत होते.
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार व मान्यवरांना एनसीसी छात्रांकडून मानवंदना देण्यात आली. तसेच मविद्यालयातील विद्यार्थिनींकडून सर्व मान्यवरांचे औक्षण करण्यात आले. कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर नवीन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सर्वात प्रथम रयते मधून नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे, या रयत गीताने सुरुवात झाली. यानंतर १९६४ पासून सुरू महाविद्यालयाचा प्रवास दाखवणारी ‘दादा पाटील महाविद्यालय : एक दृष्टीक्षेप’ ही चित्रफीत दाखविण्यात आली. आ. रोहित पवार यांनी मान्यवरांचे स्वागत करताना केलेल्या मनोगतात म्हटले की, कर्जत जामखेडची गरज ओळखून येथे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एक चांगले ऑडिटेरियम नसल्याचे खा. शरद पवार यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने त्यास भरीव मदत देऊन ही देखणी इमारत उभी राहिल, याकडे लक्ष दिले असे सांगत तालुक्यात रयत संकुलासाठी व विविध शाखासाठी अनेक कुटुंबांनी मदत केल्याचे सांगत त्यांचा आवर्जून उल्लेख केला. कर्जतमध्ये झालेल्या आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धा, बाल साहित्य संमेलन, स्त्री शिक्षिका संमेलन यासह विविध शाळांना दिलेली मदत यासह मतदारसंघात सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेऊन काम करत असल्याची माहिती आ. रोहित पवार यांनी यावेळी दिली. विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी प्रास्ताविक करताना तीन जिल्ह्यात रयतची पहिली शाखा कर्जतमध्ये कर्मवीरांनी काढली. या दुष्काळी भागात या वास्तूच्या माध्यमातून रयतच्या शाखेला मिळालेले सर्वात मोठे ऑडीटेरियम असून, ग्रामीण भागातील शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. कर्जत जामखेडला आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून एक सक्षम नेतृत्व मिळाले असल्याचे सांगत त्याच्यामुळे अनेक मोठी कामे या भागात येत असल्याचे म्हटले.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपदी निवड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमदार रोहित पवार, शारदाबाई पवार सभागृहाचे आर्किटेक्ट मंदार सिकची, मे. बजरंगबली कन्स्ट्रक्शन, थेरवडीचे प्रमुख मोहन गोडसे व उत्तर विभाग बिल्डिंग सुपरवायझर रामचंद्र नलगे यांचा विशेष सत्कार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व मा.खा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांनी बोलताना रयतेच्या इतिहासात एवढे मोठे सभागृह होऊ शकले नाही ते आ. रोहित पवार व राजेंद्र फाळके यांच्या माध्यमातून कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयाला मिळाले असल्याचे म्हटले. खा. शरद पवार हे बारामतीकर नाहीत तर मूळचे सातारचे असल्याचे सांगत त्याचा संपूर्ण इतिहासच सांगितला. अण्णाच्या कुटुंबीयाचे व पवार कुटुंबीय यांचे विशेष नाते होते. असे म्हणत अनेक जुन्या आठवणी कथन केल्या. रयत शिक्षण संस्थेचे पहिले बिनपगारी कार्यकर्ते म्हणून कर्जत तालुक्यातील टाकळीचे दादा पाटील सहभागी झाले व उत्तर भागातील पहिले विद्यालय कर्जतला सुरू केले. तर १९६४ ला कर्जत कॉलेजची स्थापना केली. अत्यंत कष्ट घेत येथील सर्व संकुले दादांनी उभी केली. अण्णाच्या शेवटच्या क्षणी फक्त दादा पाटीलच त्याच्या जवळ होते. अशा अनेक आठवणी त्यांनी सांगताना आता पुढे अनेक आव्हाने आहेत ती पेलावावी लागणार आहेत असे सांगताना, युनीटी विद्यापीठ म्हणून ही हे कॉलेज आगामी काळात उभे राहू शकेल. आगामी काळात पेटंटवर विशेष काम करायचे असून रयतचा केजी टू पिजी हा प्रवास रोमहर्षक आहे असे म्हटले.
शारदाबाई पवार सभागृहाच्या उद्घाटनासाठी आलेले खा. शरद पवार यांनी बोलताना पूर्वीच्या काळी आबासाहेब निंबाळकरांमुळे अनेकदा या भागात आलो, या भागाचे विशेष वैशिष्ठ काय तर दुष्काळ, व हा दुष्काळ पाहण्यासाठी पंतप्रधान या भागात आले होते. या भागाचा रयतशी व दादा पाटील यांच्याशी एक ऋणानुबंध आहे. आगामी काळात शिक्षणात अनेक संधी उपलब्ध आहेत. आज जी आव्हाने येत आहेत त्याला तोंड देणारे शिक्षण उभारावे लागेल. नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. जगात कृत्रिम बुद्धिमत्ता यावर मोठे काम सुरू आहे. त्यादृष्टीने शिक्षण देण्याची गरज असून त्यावर आम्ही काम करत आहोत. शिक्षणाच्या बाबतीत नुकतीच एक बैठक आपण बोलावली होती व चर्चा करून आधुनिक शिक्षणासाठी तीन संस्थां ऑक्सफर्ड विद्यापीठ, मायक्रोस्वॉफ्ट व आबीएम यांच्याशी करार केला आहे असे पवार यांनी सांगितले.
कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील येक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी एक कोटी रुपयांची ठेव जाहीर करून त्या पैशाच्या व्याजातून दोन व्िाद्यार्थ्याना शिष्यवृत्ती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. कर्जत जामखेडचा चेहरा बदलण्यासाठी रोहित पवार यांना आपण ताकद दिली व त्याने अत्यंत चांगले काम उभारले असल्याचे कौतुक उदगार ही काढताना, कर्जत मध्ये हे देखणे सभागृह उभे राहिले असले तरी याच्या देखभालीची मोठी जबाबदारी असून इतरांना देताना ते मोफत देऊ नका असा सल्ला ही पवार यांनी व्यवस्थापनाला दिला. या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जाणारे मॅनेजिंग कोंसील कमिटीचे सदस्य रामशेठ ठाकूर, अरुण कडू, आ. निलेश लंके, आ. आशितोष काळे, दादाभाऊ कळमकर, बाळासाहेब बोठे, बाबासाहेब भोस, मीनाताई जगधने, तुकाराम कन्हेरकर, रविंद्र पवार, डॉ विठ्ठल शिवणकर, डॉ. एम डी शेख, प्राचार्य नानासाहेब गायकवाड, माजी प्राचार्य रामदास शेटे, मा. आ. राहुल जगताप, घनश्याम शेलार, दादा पाटील यांच्या घरातील निर्मला पाटील, आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी प्र. प्राचार्य डॉ संजय नगरकर यांनी रयतेचा ताजमहल असा या सभागृहाचा उल्लेख करत हा उभा करण्यासाठी व या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वाचे आभार मानले. यावेळी अनेक मान्यवर रयत सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भारती काळे व प्रा. स्वप्निल मस्के यांनी केले.