अखिल भारतीय काँग्रेस प्रतिनिधी नियुक्तीत बुलढाणा जिल्ह्याचा दबदबा!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अधिवेशन २४ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत रायपूर (मध्यप्रदेश) येथे होत असून, या अधिवेशनापूर्वी काँग्रेसच्या अखिल भारतीय प्रतिनिधींची यादी जाहीर झाली आहे. या यादीत बुलढाणा जिल्ह्याचे माजी खासदार तथा राष्ट्रीय सरचिटणीस मुकूल वासनिक यांच्यासह पाच जणांचा बुलढाणा जिल्ह्यातून समावेश झालेला आहे. माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे, माजी आमदार तथा राष्ट्रीय सरचिटणीस हर्षवर्धन सपकाळ, गणेश पाटील व विजय अंभोरे यांचा या अ. भा. प्रतिनिधी सभेत सहभाग झाल्याने राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जिल्ह्याचा चांगलाच दबदबा निर्माण झाला आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीवर सध्या देशभरातून प्रतिनिधी नियुक्त करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील नियुक्त प्रतिनिधींची यादी जाहीर झाली. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून माजी खासदार मुकूल वासनिकांसह माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, गणेश पाटील, विजय अंभोरे, माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वासनिक हे जिल्ह्यातील माजी खासदार असून, माजी केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत. सद्या ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीवर सरचिटणीस आहेत व राज्यसभेचे विद्यमान खासदार आहेत. विशेष म्हणजे, आजही ते बुलढाणा जिल्ह्याशी संबंध ठेवून आहेत.
हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असून, अ. भा. काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. त्यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. गणेश पाटील हे जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष असून, सध्या प्रदेश काँग्रेसचे सचिव आहेत. विजय अंभोरे यांनीसुध्दा जिल्हा काँग्रेस व प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्षपदावर काम केले आहे. सद्या ते प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. तर राहुल बोंद्रे हे चिखलीचे माजी आमदार असून, जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. अ. भा. काँग्रेस कमिटीवरील प्रतिनिधींना काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवड़णुकीत मतदानाचा अधिकार असतो. एकंदरीत या प्रतिनिधींना वेगळे महत्त्व असते. या निवड़ीबद्दल या काँग्रेस नेत्यांचे कौतुक होत आहे.