Head linesKARAJATPachhim Maharashtra

हडपसरमधील अनुज शेवाळे यांची बैलजोडी ठरली यंदाच्या वर्षीची ‘महाराष्ट्र केसरी’ बैलगाडी शर्यत स्पर्धेची विजेती!

कर्जत (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत स्पर्धेची परंपरा जोपासण्यासाठी व पुढे नेण्यासाठी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्रातील सर्वात भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धेच्या दुसर्‍या पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कर्जत येथे आ. रोहित पवार यांनी महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले, याचा समारोप राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते झाला. या रंगतदार शर्यतीत अंतिम स्पर्धेत विजेतेपदावर आपले नाव कोरण्यात हडपसर येथील अनुज नितीन शेवाळे यांना यश आले असून, द्वितीय क्रमांकावर राजूशेठ मासाळ लोणंद यांनी आपले नाव कोरले आहे व तृतीय पारितोषिक अंश उत्तम गवळी बदलापूर यांना मिळाले.

यावेळी आ. रोहीत पवार यांनी बोलताना एवढी मोठी स्पर्धा घेताना मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. बारामती ही माझी जन्मभूमी असली तरी कर्जत जामखेड ही कर्मभूमी असून, लढायचे कसे हे तुम्ही शिकवले तर सर्वसामान्यांसाठी झटायचे कसे हे पवार साहेबांनी शिकवले असे म्हटले. यावेळी खा. शरद पवार यांनी बोलताना या देशात अनेक राजे होऊन गेले, महाराजे होऊन गेले पण सर्वसामान्याच्या मनावर आजही फक्त छ शिवाजी महाराज राज्य करत आहेत व त्याच्या नावाने ही स्पर्धा होत असून, यामाध्यमातून देशात कर्जत जामखेडचे नाव गाजवले जात आहे. साहित्य, खेळ, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, शेती अशा विविध क्षेत्रात आ. रोहित पवार विशेष काम करत असल्याचे व आपण सर्वांनी दाखवलेला विश्वास सार्थ करत असल्याचे कौतुक आहे असे खा. शरद पवार यांनी म्हटले. या स्पर्धेला अनेक आमदार, नेते व दिग्गज मंडळी या बैलगाडी शर्यत स्पर्धेला उपस्थित होते.

सोमवार रात्रीपासूनच राज्यभराच्या कानाकोपर्‍यातून बैलगाडी शर्यतप्रेमी कर्जत शहरात दाखल झाले होते. मंगळवारी सकाळी नोंदणी सुरू झाली आणि त्यानंतर स्पर्धेचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पार पडले. अवघ्या राज्यभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला असल्याचे यावेळी पाहायला मिळाले. राज्यभरातील तब्बल २६४ बैलगाड्या या स्पर्धेत सहभागी झाल्या. दिवसभर स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तसेच अत्यंत अटीतटीची लढत स्पर्धेच्या ठिकाणी पाहायला मिळाली. गेल्या काही वर्षांत यांत्रिकीकरणामुळे बैलांचा वापर शेतीसाठी काही प्रमाणात कमी झाल्याचेही निदर्शनास येत आहे. पण अशा स्पर्धा आयोजित केल्यामुळे शेतकरी आणि बैलाचे नाते आणखी घट्ट होईल आणि त्याला एक नवे वळण मिळेल तसेच आपली परंपरा जोपासली जाईल हा महत्त्वाचा हेतू ही स्पर्धा आयोजित करण्यामागे असल्याचं आमदार रोहित पवार यांनी उद्घाटन प्रसंगी बोलून दाखवले.

या रंगतदार शर्यतीत अंतिम स्पर्धेत विजेतेपदावर आपलं नाव कोरण्यात हडपसर येथील अनुज नितीन शेवाळे यांना यश आलं असून द्वितीय क्रमांकावर राजूशेठ मासाळ लोणंद यांनी आपलं नाव कोरलं आहे व तृतीय पारितोषिक अंश उत्तम गवळी बदलापूर यांना मिळाले. खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यत स्पर्धेचा थरार कर्जत शहरातील लकी हॉटेल शेजारी असलेल्या मैदानावर पाहायला मिळाला. एकूण ३५ गट सकाळपासून संध्याकाळपर्यंत या शर्यतीत पळविण्यात आले. महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत स्पर्धेतील विजेत्यांना २ गटात बक्षिसांचे वितरण करण्यात आले. ज्यामध्ये अंतिम स्पर्धा आणि द्वितीय स्पर्धा अशी विभागणी करण्यात आली होती. दोन्ही विभागात प्रत्येकी ७ असे १४ बक्षिसे विजेत्यांना देण्यात आली. अंतिम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या बैलगाडी मालकाला २ लाख २२ हजार २२२ रुपये, सन्मानचिन्ह आणि मानाची गदा तर द्वितीय आणि तृतीय आलेल्या विजेत्यांना अनुक्रमे १ लाख ११ हजार १११ रुपये आणि ७७ हजार ७७७ रुपये बक्षीस स्वरूपात देण्यात आले. तसेच द्वितीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणार्‍या स्पर्धकांना अनुक्रमे ५१ हजार १११, ४१ हजार १११ आणि ३१ हजार १११ रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


आ. रोहित पवार यांचा अपघात; थोडक्यात बचावले!

बैलगाडी शर्यतीच्या उद्घाटनप्रसंगी मोठी गर्दी झाली होती, यामध्ये आ. रोहित पवार व त्याचे समर्थक ऐका गाडीत चढले. या बैलगाडीतून मैदानात चक्कर मारायची होती. मात्र अचानक या बैलगाडीची मधली दांडी तुटली. यामध्ये आ. रोहित पवार यांना कोणतीही दुखापत झाली नाही. त्यामुळे अनेकांचा काळजाचा ठोका चुकला होता मात्र सर्वांनी सुस्कारा सोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!