Sangali

वाद्यांचे मार्केटिंग करण्यासाठी मिरज येथे मॉल उभा करण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

मिरज (प्रतिनिधी) – मिरज येथे तयार होणाऱ्या वाद्यांचे मार्केटिंग करण्यासाठी मॉल उभा करण्यासाठी प्रयत्नशील असून कलाकार मानधनाप्रमाणे तंतुवाद्य बनविणाऱ्यांनाही मानधन मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मिरज येथील दर्ग्याचा उद्यार करण्याचे काम चालू आहे. संगीताचे प्रशिक्षण, कार्यक्रम घेण्यासाठी मिरज येथे सभागृह बांधण्यासाठी जागा उपलब्ध झाल्यास आवश्यक निधी देण्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिली.

संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांच्या मिरज येथील अर्ध पुतळा सुशोभीकरणाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका व पद्यविभुषण स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, नगरसेविका नर्गिस सय्यद, दैनिक लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम, दैनिक सकाळचे सहयोगी संपादक शेखर जोशी, सुशांत खाडे, नगरसेवक गणेश माळी, भाजपा शहर अध्यक्ष बाबासाहेब आळतेकर आदि उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, संगीत रत्न अब्दुल करीम खाँ एक महान व्यक्ती होत्या. त्यांच्यामुळे तंतुवाद्य सातासमुद्रापलीकडे गेले आहे. मिरजकर अत्यंत भाग्यवान आहेत. या भूमीत अनेक नामवंत, किर्तीमान व्यक्ती होवून गेल्या. ज्या व्यक्तींनी आपआपल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केले त्यापैकी एक महान व्यक्ती म्हणजे संगीतरत्न अब्दुल करीम खाँ. उत्तर भारतातील अब्दुल करीम खाँ हे दक्षिण भारतातील लोकांचे ताईत बनले. त्यांनी आपली कर्मभूमी म्हणून मिरजेला स्वीकारली. मिरजेला संगीतनगरी म्हणून ओळखली जाते. मिरज येथील दर्ग्याचा उद्यार करण्यासाठी 2 कोटी 8 लाख रूपये दिले होते. त्यामध्ये गेस्ट हाऊस व अन्य सुविधा उपलब्ध करून त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. पुढील उपक्रमामध्ये दर्ग्यासाठी बजेटमध्ये 59 कोटी रूपयांची मागणी दर्ग्याच्या सुशोभिकरणासाठी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पद्यविभुषण स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे म्हणाल्या, आज आपल्यासाठी खूप मोठा आनंदाचा दिवस आहे संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांची 150 वी जयंती आणि त्यांच्या पुतळ्याचे सुशोभिरकण असे दोन्ही साजरे होत आहे. संगीत जगतासाठी ही जागा आज एक तीर्थस्थान बनली आहे हे आपण पहात आहोत. दरवर्षी येथे होणाऱ्या संगीत उत्सवाने आज एका मोठ्या सणाचे रूप घेतले आहे. संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांच्यामुळे किराणा घराण्याची संगीतप्रेमींना ओळख झाली. वस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब ते पंडीत भिमसेन जोशी पर्यंत अनेक महान कलाकारांनी किराणा घराण्याला श्रीमंत केले आहे. सामान्य श्रोत्यापर्यंत संगीत पोहोचवले आहे. श्रोत्यांच्या मनात संगीताबद्दल प्रेम, आदर, गोडी निर्माण केली आहे. शास्त्रीय संगीत हे केवळ शास्त्र नाही तर ती कला आहे. मन प्रसन्न आनंदीत करणारी या जगाची सुंदर मंगल शास्वत आहे. त्याचा स्पर्श करून देणारी ही कला आहे. याच दृष्टीकोनातून किराणाच्या कलाकारांनी संगीताची साधना केली आहे. श्रोत्यांना त्याची जाणीव करून दिली आहे. संगीताच्या सर्व प्रकाराचे दर्जेदार प्रस्तुतीकरण केले आहे. संगीत उत्सव मोठ्या जोमाने असाच पुढे सुरू राहील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी दैनिक लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. प्रास्ताविक दैनिक सकाळचे सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी केले. सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले. आभार बाळासाहेब मिरजकर यांनी मानले. या कार्यक्रमास डॉ. विनोद परमशेट्टी, मुस्तफा मुश्रीफ, डॉ. एस. मुजावर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!