आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : तीर्थक्षेत्र आळंदीत ग्रामस्थ व विविध सेवाभावी संस्था, मंडळे यांचे वतीने एकत्र येऊन ‘एक गाव एक शिवजयंती’ ( दि.१९ ) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी सांगितले.
आळंदीत गेल्या काही वर्षापासून आळंदी आणि पंचक्रोशीत आळंदी पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली एक गाव एक शिवजयंती उत्सव आयोजित केला जातो. त्याच प्रमाणे यावर्षी देखील आळंदीत तसेच पंचक्रोशीत शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आळंदीत आळंदी ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी सहा वाजता आळंदी नगरपरिषद चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्यास अभिषेक आणि पुष्पांजली पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर या उपक्रमाचा भाग म्हणून श्री क्षेत्र तुळापूर ते आळंदी अशी शिवज्योत शिवभक्त उत्साहात आणणार आहेत. आळंदी नगरपरिषद चौकात श्रींचे स्मारका शेजारील प्रशस्त जागेत सालाबाद प्रमाणे यावर्षी ही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात आळंदी परिसरातील नागरिक. भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
येथील शिवस्वराज्य प्रतिष्ठान आळंदी आणि रौद्र शंभो फाउंडेशन यांच्या प्रयत्नातून विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन सालाबाद प्रमाणे यावर्षी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत रक्तदान शिबीर होत आहे. सायंकाळी पाचच्या दरम्यान शिवजयंती उत्सवा निमित्त भव्य शोभायात्रा श्रींची मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत चित्ररथ, ढोल, ताशा पथक, बँड पथक, वारकरी दिंडी, लक्षवेधी रांगोळीच्या पायघड्या, सवाद्यात नगारखाना, मर्दानी प्रात्यक्षिके, अश्वारूढ मावळे, फटाक्यांचे आतिश बाजी मिरवणुकीचे मार्गावर होणार आहे. येथील चाकण चौक, भैरवनाथ चौक, नगरपालिका चौक मार्गे मिरवणूक शिवाजी महाराज स्मारक येथे येईल.
या मिरवणुकीसह शिवजयंतीसाठी आळंदी ग्रामस्थ आणि आळंदी पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे आणि दिघी आळंदी वाहतूक शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुसंवाद बैठक घेण्यात आली. यावेळी आळंदी ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक नगरपरिषदेचे माजी पदाधिकारी, युवक तरुण उपस्थित होते. आळंदी ग्रामस्थांच्या वतीने एक गाव एक शिवजयंती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावलौकिकात वाढ होईल असा शिवजयंती उत्सव सर्व नागरिकांना ग्रामस्थांना विश्वासात घेऊन आळंदीत राबविला जात आहे.