सांगलीत पाण्यासाठी राजकारण पेटलं; युवराजांच्या साथीने आमदार सुमनताई बसल्या आमरण उपोषणाला!
– पाण्यासाठी राजकारण पेटलं तर दोन्ही पाटलांच्या वादात आमदार बाबरांनी आणली प्रशासकीय मान्यता!
सांगली (संकेतराज बने) – ‘पाण्यावरून राजकारण करणार नाही, असं मी ठरवलेले आहे. पण मी निश्चितपणे सांगतो, टेंभू योजनेच्या तिसऱ्या सुधारित प्रस्तावास मान्यता मिळेल, त्या दिवशी विरोधकांना उत्तर देईन. ते म्हणाले होते स्वर्गीय आर. आर. पाटील यांचा इतिहास बाहेर काढू; पण मी जाहीरपणाने सांगतो, त्यावेळी तुमचा इतिहास बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ असा इशारा खासदार संजय पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पाटलांनी दिला. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणात ते बोलत होते. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 18 गावांत पाण्यासाठी सांगली जिल्ह्यातील राजकारण पेटले आहे. भाजपचे खासदार संजय पाटील विरुद्ध आमदार सुमन पाटील यांच्यात टेंभूच्या पाण्यासाठी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. या गावांना पाणी मिळण्यासाठी आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. या वेळी त्यांनी खासदार पाटलांनी दिवंगत आर. आर. पाटलांवर केलेल्या टीकेचा हिशेब करत सरकारवर कडाडून टीका केली.
रोहित पाटील म्हणाले, “या 18 गावांतील जनतेला हक्काचे पाणी मिळण्यासाठी गेली कित्येक वर्षे लढा देत आहोत. दुष्काळाची झळ पोहोचते, त्यावेळी सरकार भीक दिल्यासारखे आम्हाला पाणी देते. तासगावच्या पूर्व भागाला आणि कवठेमहांकाळमधील गावांना जाणूनबुजून सरकार दुर्लक्ष करते का? याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तासगाव तालुका द्राक्ष पिकासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, पाणी नसल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे हक्काचे पाणी मिळेपर्यंत या उपोषणाला बसणार आहाेत.” टेंभू सिंचन योजनेत तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 17 गावांचा समावेश करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या आमदार सुमनताई पाटील आजपासून उपोषण करणार होत्या. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार होत्या. मुलगा रोहित पाटील आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. मंजूर असताना ही वारंवार मागणी करून ही प्रशासनाकडून पाण्यापासून वंचित असणार या गावांचा टेंभू योजनेत समावेश करण्यात येत नसल्याने सुमनताई आणि रोहित पाटील यांनी राज्य सरकार विरोधात थेट बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला होता.
शरद पवार, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी या आंदोलनाबाबत विचारणा केली आहे. सरकारने तोडगा काढला नाही तर ते स्वतःदेखील या प्रश्नासाठी सांगलीत येतील, असा विश्वास रोहित पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, टेंभू योजनेच्या पाण्यासाठी आमदार अनिल बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळवला आहे. असे असले तरी विस्तारित टेंभू योजनेच्या तृतीय सुधारित प्रशासकीय अहवालास मान्यता मिळावी. जोपर्यंत याला मान्यता मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, अशी भूमिका आमदार सुमन पाटील यांनी घेतली आहे.
या गावांचा पाण्यासाठी संघर्ष..
सांगली जिल्ह्यातील तासगावमधील सावळज, सिद्धेवाडी, दहिवडी, जरंडी, यमगरवाडी, वायफळे, बिरणवाडी, डोंगरसोनी, वडगाव, लोकरेवाडी, तर कवठेमहांकाळ तालुक्यातील जाखापूर, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली तिसंगी, घाटनांद्रे, रायवाडी, केरेवाडी आणि शेळकेवाडी या गावांना अनेक वर्षापासून पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
दोन्ही पाटलांचा पाण्यासाठी वाद ; आमदार बाबरांनी आणली प्रशासकीय मान्यता
दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभू योजनेच्या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या विस्तारीत योजनेसाठी ८ टी.एम.सी. पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे खानापूर,आटपाडी व विसापूर सर्कल तासगाव तालुक्यातील ३४ गावांना त्याचा लाभ होणार आहे. याच शासन निर्णयाची प्रत मुख्यमंत्री शिंदे यांनी आटपाडी खानापूरचे आमदार अनिल बाबर यांच्याकडे सुपूर्द केली आहे.