सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील वागजाई येथील सरपंच गजानन सानप व इतर ग्रामस्थ हे २९ सप्टेंबरपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. दिनांक १ ऑक्टोंबररोजी सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार तोताराम कायंदे व डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या मध्यस्थीने त्यांचे उपोषण सोडण्यात आले. उपोषणकर्त्यांची नुसत्या आश्वासनावर बोळवण झाली आहे. प्रत्यक्ष कामाला सुरूवात केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असे सांगणारे उपोषकर्ते व सरपंच अखेर आश्वासनावर उपोषणातून उठले आहेत.
गत नऊ महिन्यापासून सरपंच व ग्रामस्थ यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन देऊनही अपूर्ण रस्ता पूर्ण केला गेला नाही. निकृष्टदर्जाच्या कामाची चौकशी केली नाही म्हणून सरपंच व इतरांनी उपोषण सुरू केले होते. काल संध्याकाळी माजी आमदार तोताराम कायंदे व माजी आमदार खेडेकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, उपविभागीय अभियंता बी. एस. काबरे, कनिष्ठ अभियंता महेश भाले यांनी वागजाई येथील सरपंच गजानन सानप व ग्रामस्थ यांना लेखी आश्वासन दिले. त्या आश्वासनावर सरपंच व इतरांनी आपले उपोषण सोडले.
बांधकाम विभागाने सरपंचांना दिलेले आश्वासन…
जळगाव ते वागजाई हद्दीपर्यंत भूमी अभिलेख जिल्हा परिषद बांधकाम विभागकडून ईजीएसकडून परवानगी मिळवून त्याची मोजणी करून पुढील कार्यवाही करणे, जळगाव ते वागजाई फाटा अपूर्ण काम पूर्ण करून साईडपट्टया भरून नाली बांधकाम करणे, गावातील डी.पी.पासून नाल्यापर्यंत बांधकाम विभागाच्या रेकॉर्डप्रमाणे ३० फूट रोड करून नाल्या तयार करून पाणी नाल्यात सोडणे, डोंगराळ भागातील नैसर्गिक येणारे पाणी प्रवाह प्रमाणे डिजाइन काम पूर्ण करून काम करून देणे, बांधकाम विभागाने साईडला असलेली झाडे परवानगी घेऊन तोडून देणे, संरक्षण भिंतीच्या पाण्याचा प्रवाह सर्वेक्षण करून इतर विभागाकडून माहिती घेऊन माहिती १५ दिवसात सादर होईल, अंदाजापत्रकानुसार काम तयार आहे, असे लेखी आश्वासन बांधकाम विभाग यांनी सरपंच यांना दिले.