कर्जत (प्रतिनिधी) – भरजरी फेटे घातलेल्या विद्यार्थिनी, ढोल ताश्यांच्या गजरात गुणवंत विद्यार्थिनींचे झालेले आगमन आणि उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट अशा भारावलेल्या वातावरणात, येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ.सोनाबाई नामदेवराव सोनमाळी कन्या विद्या मंदिरमध्ये गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते. मिरजगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, सहायक विभागीय अधिकारी शिवाजीराव तापकीर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दामोदर आडसुळ, स्थानिक स्कूल कमिटी सदस्या डॉ. शबनम इनामदार, उद्योजक राहुल नवले, माजी मुख्याध्यापिका उल्का केदारे, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य मुस्तफा सय्यद, पोलीस अंमलदार दत्तात्रय कासार, भालचंद्र देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका बहार पठाण यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते विविध शासकीय परीक्षांमध्ये यश संपादन करणार्या ८० विद्यार्थिनींचा गौरव चिन्ह, मेडल आणि प्रशस्तीपत्रक देऊन पालकांसह सन्मान करण्यात आला. याप्रसंगी अनेक पालक भावूक झाले होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणांमध्ये कन्या विद्यामंदिर मधील मुलींनी शासकीय स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा, शासकीय चित्रकला परीक्षा, गणित-विज्ञान प्रदर्शन आणि एसएससी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणार्या विद्यार्थिनींचे कौतुक केले. शाळेची प्रगती उत्कृष्ठ असल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले. शेवटी आभार पर्यवेक्षक सुरेश भोयटे यांनी मानले.
विद्यार्थिनींचे कष्ट, शाळेची साथ आणि पालकांनी टाकलेला विश्वास यामुळेच हे यश संपादित करता आले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच शारीरिक आणि मानसिक विकासासाठी विद्यालय सतत प्रयत्नशील असते. याकामी रयत शिक्षण संस्थेच्या अधिकारी आणि पदाधिकार्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते.
– बहार पठाण, मुख्याध्यापिका.