कर्जत भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार; दोन आमदारांच्या मतदारसंघात जनतेला वाली कोण?
कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार समोर आला असून, कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहत नाहीत, ड्रोन मोजणीच्या नावाखाली नेमके कोठे जात आहेत, हे समजते यासाठी असलेले हालचाल रजिस्टरला नोंदच केली जात नाही. कार्यालयीन प्रमुख यांचा फोन बंद होता, तर मुख्यालय सहाय्यक जागेवर नसल्याने त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, त्यानी उड़वाउडवीची उत्तरे देत, ‘मी उत्तरे द्यायला बांधिल नाही’, असे म्हणत अत्यंत गर्मीत बोलत, तालुक्यात आमचे कुणी काही करू शकत नाही, हेच एक प्रकारे निर्देशित केले. कर्जत तालुक्याला दोन आमदार असताना भूमी अभिलेख कार्यालय हे तहसील, प्रांत या शासकीय कार्यालयांना जुमानत नसेल तर सर्वसामान्य नागरिक वा पत्रकार यांना कशी वागणूक देत असतील यांचे उत्तर लोकप्रतिनिधी व कार्यालयीन वरिष्ठ देतील का? अशा कार्यालयाना व कर्मचार्यांना जनता व स्थानिक नेते जाब विचारिल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्जत तालुका भूमी अभिलेख कार्यालय सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. मात्र कोणताही विषय तात्पुरता चर्चीला जातो यावर वरिष्ठ कोणतीही कार्यवाही करत नसल्याने या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हम करे सो कायदा या प्रमाणे स्वत:च्या मर्जी प्रमाणे वागत आहेत. कर्जत येथील भूमी अभिलेख कार्यालयात दि. १७ फेब्रूवारी रोजी राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य गुलाब तनपुरे व भाजपाचे कोरेगावचे माजी सरपंच बापुसाहेब शेळके हे आपल्या कामासाठी दुपारी आले होते. मात्र कार्यालयात एक दोन कर्मचारी व्यतिरिक्त कोणीही नव्हते. बराच वेळ कोणतीही माहिती मिळत नसल्याने भाजपाचे शेळके यांनी पत्रकारांना बोलावले. कोरेगाव (ता.कर्जत) येथील गट नंबर ११६२ मध्ये अवैध गौण खनिजांचे उत्खनन झाले असून, त्याबाबत शेळके यांनी सहा महिन्यांपूर्वी तक्रार केली होती. याबाबत तहसीलदार कर्जत यांनी त्याची इटीएस मोजणी करून अहवाल सादर करण्याचे पत्र दीड महिन्यांपूर्वी दिले असताना, आजमितीस यांनी कोणतीच कार्यवाही केलेली नाही, हे पहावयास मिळाले. पत्रकारांनी कार्यालयात असलेले हालचाल रजिस्टरची माहिती कार्यालयात विचारली असता, त्याबाबत कोणीच बोलायला तयार नव्हते, कर्जतचे उपअधीक्षक अनंत पाटील यांना दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, फोन बंद लागत होता. तर कार्यालयीन सहाय्यक उमेश कोदे यांचेशी पत्रकारांनी संपर्क साधला असता, ”आज कार्यालयात कोणीही माहिती देऊ शकत नाही, मी आपल्याला उत्तर द्यायला बांधील नाही, हालचाल रजिस्टरला नोंद केली नाही, नगरला कोणत्या कामासाठी आलो आहे हे सांगू शकत नाही”, असे म्हणत अरेरावीची भाषा वापरली व तुम्ही प्रश्न विचारणारे कोण, असा प्रश्न उपस्थित करत, ”तुम्हाला काय छापायचे ते छापा मी काही पाकिस्तानमधून आलेलो नाही”, असे उत्तर दिले. याबाबत जिल्हा अधीक्षक सुनील इंदलकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
कर्जत – जामखेड मतदार संघाला सध्या राष्ट्रवादीचे व भाजपाचे असे दोन आमदार असताना ऐका शासकीय कार्यालयात कामे होत नसतील, व या दोन्ही पक्षाच्या दोन नेत्यांना तासन् तास बसावे लागत असेल, तर सर्वसामान्याच्या प्रश्नाला वाली कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पत्रकारांनी याबाबत खा. सुजय विखे, आ. रोहित पवार व आ. राम शिंदे यांना हा सर्व प्रकार कळविला असून, यातील कोण काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अवैध गौण-खनिजसारख्या प्रकरणात भूमी अभिलेखचा हलगर्जीपणा होत असून, आपण वारंवार कार्यालयात येत आहे. येथे कोणीच आढळून येत नाहीत. अनेक लोक चकरा मारतात पण त्याचे कामे होत नाहीत, तहसीलदार यांच्या तात्काळच्या पत्रालाही हे उत्तरे देत नसतील तर सर्वसामान्याशी हे कसे वागत असतील.
– बापूसाहेब शेळके, भाजपा नेते, कोरेगाव
भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार अत्यंत गचाळ असून, येथील कुणीही उत्तर देत नाहीत, फोन उचलत नाहीत, तहसीलदार यांच्या दंडकामी तात्काळ मोजणीच्या पत्राला आठ दिवसात उत्तर मिळणे आवश्यक असताना, अद्याप ते मिळाले नसेल तर हे प्रशासकीय कामातील हलगर्जीपणा आहे, असे मत तहसील कार्यालयातील ऐका वरिष्ठ अधिकार्याने व्यक्त करत आम्हीसुद्धा या कार्यालयाला वैतागलो आहोत, असे म्हणत आपली हतबलता व्यक्त केली.
———————–