बुलढाणा (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती जल्लोषात साजरी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने १९ फेब्रुवारी रोजी सकाळपासून भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी नऊ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपारिक शिवजन्मोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम शाहिरी पोवाडा, समूहगाण होईल. स्वराज्यातील प्रमुख पाच गडांवरील जल मातीने शिवरायांना अभिषेक करण्यात येणार आहे. यावेळी माँसाहेब जिजाऊ, शिवबा व मावळ्यांच्या वेशभूषेत शेकडो शिवप्रेमी सहभाग होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आदिवासी, फासेपारधी, बंजारा, म्हसणजोगी, वासुदेव, भजनी मंडळी, गोंधळी या लोककलावंतांचा पारंपरिक वाद्य आणि वेशभूषेत सहभाग राहणार आहे. दुपारी तीन वाजता संगम चौकातून भव्य शोभायात्रेस प्रारंभ होईल. शहरातील प्रमुख मार्गावरून ही शोभायात्रा काढण्यात येणार असून, रात्री उशिरा शोभयात्रेचा समारोप होईल. जिल्ह्यातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.