तुपकरांच्या आंदोलनापुढे पीकविमा कंपनी झुकली, दोन लाख शेतकर्यांच्या खात्यात १५६ कोटी जमा, उर्वरित तीन आठवड्यात देणार!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर व त्यांचे सहकारी, आणि शेतकरी यांनी पोलिसांच्या लाठ्याकाठ्या छाताडावर झेलून, खोटे गुन्हे व कारावास सोसून केलेले आंदोलन अखेर अंशतः का होईना यशस्वी झाले आहे. या आंदोलनामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख शेतकर्यांच्या खात्यात पीकविम्याचे जवळपास १५६ कोटी रूपये जमा झाले असून, उर्वरित नुकसान भरपाईची रक्कम ही तीन आठवड्यांत जमा होणार असल्याची माहिती ब्रेकिंग महाराष्ट्रला मिळाली आहे.
खरिप पिकांचा जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार ३६५ शेतकर्यांनी एग्रीकल्चर इन्सुरन्स कंपनी (एआयसी)कडे विमा काढला होता. या विम्याच्या हप्त्यापोटी ३३ कोटी ३० लाख रुपयांचा भरणा या कंपनीकडे झाला होता. यामध्ये तालुकानिहाय बुलढाणा ३५,५०६ शेतकरी ३ कोटी ३५ लाख विमा हप्ता. चिखली ५०,२३८ शेतकरी ४ कोटी ३५ लाख हप्ता, देऊळगावराजा ३०,६३८ शेतकरी २ कोटी १६ लाख, जळगाव जामोद १८,७८८ शेतकरी १ कोटी ८९ लाख, खामगाव २७,६९० शेतकरी ३ कोटी ३३ लाख, लोणार २३,५४९ शेतकरी १कोटी ८९ लाख, मलकापूर ५,८१६ शेतकरी ७६ लाख ९५ हजार, मेहकर ४५,८३९ शेतकरी १३ कोटी २ लाख, मोताळा ४,८७४ शेतकरी ७५ लाख ९५ हजार, नांदुरा १३,७९८ शेतकरी १कोटी ४३ लाख, संग्रामपूर २८,७५८ शेतकरी २ कोटी ९८ लाख, शेगाव २१,३९७ शेतकरी २ कोटी ३ लाख तर सिंदखेडराजा तालुक्यातील ५०,४७४ शेतकर्यांनी पीक विमा काढला असून, त्या हप्त्यापोटी ४ कोटी १७ लाख रुपये भरललेले होते.
यावर्षी सततचा पाऊस तर कुठे अतिवृष्टी तर काही भागात पूरपस्थिती निर्माण झाल्याने पिके हातची गेली. सोयाबीनला कोंब तर काही भरलीच नाही, कापसावर लाल्या तर उड़िद, मूग ही पिके दाळीलाही झाले नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला होता. आता काढलेल्या पीकविम्याचाच त्याला आधार होता. म्हणून विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी कृषी विभाग व संबंधित विमा कंपनीचे उंबरठे झिजवू लागला होता. त्यामुळे वाटपही सुरू झाले पण गती नव्हती. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. शेतकरीवर्गाची ही दयनीय अवस्था पाहाता, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. पीकविम्याचे पैसे शेतकर्यांच्या खात्यात त्वरित जमा करावे यासह कापूस, सोयाबीनला योग्य भाव द्यावा. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी व इतर रास्त मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी गेल्या महिनाभरापूर्वी मुंबईत शेतकरी व कार्यकर्त्यासह समुद्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. तर ११ फेब्रुवारी रोजी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस प्रशासनाने तो हाणून पाड़ला. यामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जाते की काय, असा कांगावा करत व दगडफेक झाल्याचे सांगून, पोलिसांनी आंदोलक शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर जोरदार लाठीमार केली होती. तसेच, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासह त्यांच्या २४ साथीदारांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांना तुरूंगात टाकले होते. परंतु, तुपकर यांनी कारागृहातही आंदोलन सुरूच ठेवले.
यामुळेच पीकविमा कंपनी व राज्य सरकार हादरले व आतापर्यंत १ लाख ९८ हजार २८४ शेतकर्यांच्या बँक खात्यात पीकविम्याचे १५५.९१ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, गेल्या दोनच दिवसात ४२ कोटींचे वाटप करण्यात आले आहेत. यामध्ये आतापर्यंत बुलढाणा तालुक्यातील १८,५५७ शेतकर्यांच्या खात्यात १५,४६,९७,६८७ रुपये, चिखली २४,१७१ शेतकरी ३०,२६,४३,३१५ रुपये, देऊळगावराजा १५,७४८ शेतकरी ८,४३,१२,४१४ रुपये, जळगाव जामोद ८,१७८ शेतकरी २,८५,२७,६०८ रुपये, खामगाव १७,४१४ शेतकरी ९,९१,६९,७५३ रुपये, लोणार १५,४५८ शेतकरी ११,३०,५५,३६९ रुपये, मलकापूर २,१७३ शेतकरी १,५१,७०,०६८ रुपये, मेहकर तालुका २५,२९४ शेतकरी २३,२३,२६.१०७ रुपये, मोताळा १,८१२ शेतकरी २,२७,९५,६०१ रुपये, नांदुरा ६,०६१ शेतकरी ४,७४,५३,६९० रुपये संग्रामपूर २०,५७२ शेतकरी १२,६४,६७,९३१ रुपये, शेगाव ९,५९२ शेतकरी ७,९२,२५,८११ रुपये तर सिंदखेड़राजा तालुक्यात ३३ हजार २१८ शेतकर्यांचे २६,६९,३५,४२८ रुपये पीकविम्यापोटी खात्यात जमा झाले आहेत. तर उर्वरित शेतकर्यांचे पैसे पुढील तीन आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती ब्रेकिंग महाराष्ट्रच्या हाती आली आहे.
पीकविम्यासाठी आमिषाला बळी पड़ून नका – एआयसी कंपनी
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार पीकविम्याचे वाटप सुरू आहे. पीक विमा मिळण्यासाठी शेतकर्यांनी कोणत्याही आमिषाला बळी पड़ून नये, असे आवाहन अॅग्रीकल्चर इन्सुरन्स कंपनीचे जिल्हा समन्वयक विशाल मांटे यांनी ब्रेकिंग महाराष्ट्रशी बोलताना केले. ७२ तासात व योग्य तक्रार केलेल्या शेतकर्यांना सद्या पीकविमा वाटप सुरू असल्याचेही ते म्हणाले.
—————