कर्जत (प्रतिनिधी) – श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त कर्जत येथे सद्गगुरू उद्योग समूहात असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले. डॉ. शंकरराव नेवसे यांच्याकडून भाविक-भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
प्रगट दिनानिमित्त सकाळी लवकर कर्जत येथील कुळधरण रोडला असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये अभिषेकासह आरती करण्यात आली व महाराजाच्या प्रतिमेची कर्जतमध्ये शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये शिरूर येथील ढोल व झांज पथक आळंदीहून आणि श्रीगोंदा येथील बाल वारकरी पथके व भजनी मंडळे सहभागी झाले होते. सद्गुरू कृषि महाविद्यालयाचे लेझीम पथक आणि सद्गुरु कन्या विद्यालयाचे भजनी मंडळ ही या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते.
कर्जत परिसर व संपूर्ण बाजारपेठे मध्ये भक्तीभावाने जयघोषानीदुमदुमुन गेला. या शोभायात्रेमध्ये शंकरराव नेवसे व त्याचे सर्व कुटुंबीय आणि सर्व संस्थांचे पदाधिकारी त्याचबरोबर विविध भाविक आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत कर्जत बाजारपेठेमध्ये ही शोभायात्रा सुरू होती. त्यानंतर दुपारी कुळधरण रोडला सद्गुरु गजानन महाराज मंदिरामध्ये पुष्पवृष्टीचा कार्यक्रम झाला. मंदिर परिसरामध्ये सद्गुरु गजानन महाराजांचा जीवनक्रम आणि गजानन विजय ग्रंथामधील २१ अध्याय सचित्र मंडपामध्ये लावलेले होते. त्यामुळे भाविकाना श्री गजानन महाराजांविषयी माहिती मिळाली याठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
प्रकट दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये खासदार सुजय विखे, आमदार प्रा. राम शिंदे, श्रीमती सुनंदाताई पवार, नामदेवराव राऊत, अंबादास पिसाळ, आजी-माजी नगरसेवक, विविध दूध उत्पादक संघाचे चेअरमन, विविध दूध उत्पादक शेतकरी आणि कर्जत पंचक्रोशीतील विविध नागरिक उपस्थित होते. महाप्रसादासाठी कर्जतची सुप्रसिद्ध शिपी आमटी, चपाती, भात, पापड, शेंगदाणे, शिरा, उपलब्ध केले होते. त्याचा सर्व भाविकांनी लाभ घेतला. महाप्रसादास जवळजवळ दहा हजार लोकानी लाभ घेतला. त्यांचे नियोजन सद्गुरु उद्योग समूहाच्या विविध शाखेच्या कर्मचार्यांनी आणि दूध उत्पादकांनी उत्तमरीत्या केले होते. त्याबद्दल डॉ. शंकरशेठ नवसे यांनी सर्वांना धन्यवाद दिले.