गुंजाळा जि.प.शाळेत तुटपुंज्या पैशात पती-पत्नी शिजवितात शालेय पोषण आहार!
– शालेय पोषण आहार कर्मचार्यांच्या मानधनाचा प्रश्न ऐरणीवर!
चिखली ग्रामीण (सुनील मोरे) – केंद्र सरकार व राज्य सरकारच्यावतीने संयुक्तरीत्या राबविण्यात येणार्या जिल्हा परिषद शालेय पोषण आहार योजनेमध्ये काम करणार्या कर्मचार्यांना केवळ २ हजार ५०० रुपये मानधन दिले जात आहे. या तुटपुंजा मानधनावरच त्यांची गुजरान सुरू आहे. त्यामुळे शासनाने या महागाईच्या काळात त्यांच्या मानधन वाढीबाबत सकारात्मक निर्णय घेवून मानधनात वाढ करावी, अशी मागणी शाळा सभापती व उपसभापती यांनी केली आहे. या निमित्ताने जिल्हाभरात अशा प्रकारे कमी मानधनात काम करणार्या कर्मचार्यांच्या मानधनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
चिखली तालुक्यातील गुंजाळा गावांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदची ४५ विद्यार्थी पटसंख्या असलेली शाळा आहे. या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून इंगळे सर तर सहाय्यक शिक्षक पदावर शेळके सर हे कार्यरत आहेत. तसेच शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी गावातील संतोष पवार व सौ.मनीषा पवार हे दोघे पती-पत्नी काम करतात. शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अन्न शिजविण्यासाठी कार्यरत महिलांना केवळ २ हजार ५०० रुपये मानधन मिळते. २० वर्षांच्या काळात सर्वच वस्तूंचे भाव वधारले आहेत. त्यामुळे २ हजार ५०० रुपयांमध्ये कुटुंबाचा गाडा चालविणे अशक्य झाले आहे.
अन्न शिजविण्यामागे शाळेत पाणी भरणे, खोल्या स्वच्छ करणे, भांडी घासणे ही सर्व कामे करावी लागत असल्याने सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतचा वेळ जातो. परिणामी, त्यांना दुसरी मजुरी करता येत नसल्याचे महिला कर्मचार्यांनी वारंवार शासनाच्या निदर्शनास आणून दिले. मानधनवाढीसाठी अनेकदा मोर्चा, निवेदन, प्रत्यक्ष शासन-प्रशासनातील व्यक्तींच्या भेटी घेण्यात आल्या, पण, शासनाने कायम दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आताचे राज्य सरकार तरी मानधनवाढीचा निर्णय घेईल का? असा सवाल सभापती गजांनन केदार, उपसभापती सुनील मोरे तथा सर्व सदस्य यांच्याकडून केला जात आहे. तरी शिक्षण विभागाने मानधनात वाढ करावी, अशी मागणी ऐरणीवर आली आहे.