सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर गणेश मापारी यांचा श्री. शिवाजी हायस्कूल मेरा बुद्रुकच्यावतीने गौरव!
मेरा बुद्रूक (कैलास आंधळे) – श्री शिवाजी हायस्कूल मेरा बुद्रुकच्यावतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आज, १४ फेब्रुवारीरोजी शाळेच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला. शाळेचा माजी विद्यार्थी गणेश मापारी यांचा सेल टॅक्स इन्स्पेक्टर झाल्याबद्दल शाळेच्यावतीने शाल, बुके देऊन शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शाळा समिती सदस्य व शिक्षकांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे शाळेचे माझे विद्यार्थी यांचा सुद्धा सत्कार घेण्यात आला.
श्री शिवाजी हायस्कूलचे शाळा समिती सदस्य अमोल पडघान, ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे बुलढाणा जिल्हा सचिव तथा पत्रकार कैलास आंधळे, विशाल पाटील, मनुबाईचे सरपंच संदीप वायाळ, शंकर पडघान, पवन खेडेकर, मनुबाई ग्रामपंचायत सदस्य दिलीप सवडतकर, रवींद्र सवडकर यांचासुद्धा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्यावतीने विशाल पाटील यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हटले की, श्री. शिवाजी हायस्कूल ही जशी ज्ञानवंताची, गुणवंताची खाण आहे तशी ती रत्नाची ही खाण असून, येथील तळागाळातील विद्यार्थी वकील, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, डॉक्टर इंजिनिअर, शिक्षक आणि मोठमोठ्या हुद्द्यावर काम करत आहेत. ही अभिमानाची आणि स्वाभिमानाची बाब आहे. येथील उच्च शिक्षित शिक्षक हे असे विद्यार्थी घडवतात हाच खरा मेरा बुद्रुकचाही मान आणि शान आहे, अशा शब्दात त्यांनी शाळेचा गौरव केला.
सेल्स इन्स्पेक्टर गणेश मापारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, गुरूजनांमुळेच यश मिळू शकले अशी भावना व्यक्त केली व ध्येयपूर्तीसाठी सातत्य, परिश्रम आवश्यक असल्याचेही त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटले. प्रास्ताविक शाळेचे पर्यवेक्षक सोळंकी सर तर अध्यक्षीय भाषण मुख्याध्यापक शेख सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खरात सर यांनी केले तर आभार पडघान सर यांनी मानले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.