कर्जत (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सकल मराठा समाज कर्जत तालुका यांच्यावतीने कर्जत येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन प्रमुख समन्वयक व शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष वैभव लाळगे यांनी केले आहे.
कर्जत येथे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मोठ्या प्रमाणात विविध उपक्रम राबवले जातात. सालाबाद प्रमाणे यावर्षीचा शिवजयंती सप्ताह सुरू होत असून, सकाळी आठ वाजता दादा पाटील महाविद्यालय समोरून भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून आलेल्या साडेतीनशे स्पर्धक या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झाले. तालुका क्रीडा समिती यांनी ही स्पर्धा पार पाडली. कर्जत पोलीस स्टेशनने बंदोबस्त देत तर उपजिल्हा रुग्णालय कर्जत यांनी स्पर्धेसाठी वैद्यकीय सुविधा अॅम्बुलन्ससह उपलब्ध करून दिली.
शिवजयंती सप्ताहामध्ये संत तुकाराम महाराज नाट्य, शरद तांदळे यांचे व्याख्यान, गणेश तांदळे यांचे व्याख्यान, सिनथडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सिनथडीमध्ये व्यवसायिकांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये सांस्कृतिक मनोरंजक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. मल्लखांब प्रात्यक्षिके, राजेंद्र कांबळे यांचा पोवाडा, जादूगार जितेंद्र रघुवीर यांचा कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, खेळ पैठणीचा अशा कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आलेले आहे, अशी माहिती प्रमुख समन्वयक सकल मराठा समाज कर्जत तालुका व शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष वैभव लाळगे यांनी दिली आहे.