सोलापूरच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा पदभार सुनील कटकधोंड यांच्याकडे!
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी सुनील कोळी यांची औरंगाबादला बदली केल्याने त्यांच्या ठिकाणी आता सुनील कटकधोंड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कोळी यांनी आपल्या कार्यकाळात अनेक टेंडरची प्रक्रिया राबविताना अनियमितता केली असल्याचा ठपका सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठेवला होता. त्यानंतर शासनाने त्यांची काही दिवसातच बदली केली. त्यामुळे त्यांचा पदभार आता कटकधोंड यांच्याकडे देण्यात आला आहे.
याप्रसंगी कटकधोंड यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची परिस्थिती वाचून दाखवली. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ९४६ गावाचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यापैकी सुधारित आराखडा ८५५ गावाचा करण्यात आला. या सर्व आराखड्याला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. १७८ गावातील कामांना अद्याप प्रशासकीय आदेश देण्याचे राहिले असल्याचेही याप्रसंगी त्यांनी सांगितले. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर नल या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील पाणीपुरवठा योजना सोलापूर जिल्ह्यामध्ये घरोघरी राविण्यात येणार आहे. यामध्ये केंद्र सरकारचा ५० टक्के व राज्य सरकारचा ५० टक्के निधीचा समावेश असणार आहे. सध्या पाणीपुरवठा विभागाकडे भरपूर निधी आहे. ही जलजीवन योजना जवळपास २०२४ पर्यंत चालणार आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशन योजने व्यतिरिक्त प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या जवळपास ३० पैकी दहा योजना सुरू आहेत. तर उर्वरित २० योजना बंद आहेत. त्यामध्ये अनेक गावातील वीज न भरल्यामुळे देखील या योजना बंद करण्यात आले आहेत. त्या योजना देखील कशा पद्धतीने सुरू करता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही या प्रसंगी सांगितले. तसेच सोलापूर जिल्ह्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी पंधरावा वित्त आयोग, स्वच्छ भारत अभियान, घनकचरा निधी, एकात्मिक आदिवासी विकास विभाग, नमामि चंद्र भागा आदी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात पाणीपुरवठा कशा पद्धतीने सुरळीत करता येईल यासाठी आमचा प्रयत्न असणार असल्याचेही याप्रसंगी कटकधोंड यांनी सांगितले. याबरोबरच ज्या ठेकेदारांना काम मिळून देखील सुरू केले नाही अशा ठेकेदारांना काळ्या यादीमध्ये टाकण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ठेकेदारांनी काम सुरू करावे आणि तीन नोटीस गेल्यानंतर चौथ्या वेळेस ठेकेदाराला काम मिळणार नाही.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा पदभार मला देण्यात आल्यामुळे मी अनेक वाड्या वस्त्याना वंचित गावाला पाणीपुरवठा देण्याचे भाग्य मला लाभले आहे. त्यामुळे या विभागात काम करीत असताना चांगलेच काम करून दाखवीन. असा माझा प्रयत्न असेल. ज्या दिवशी माझ्यावर कोणी बोट करेल त्या दिवशी कोर्या कागदावर मी माझा राजीनामा देईन.
– सुनील कटकधोंड, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग