तीन दिवसांपासून रविकांत तुपकरांच्या पोटात अन्नाचा कण नाही!
– अन्नत्याग आंदोलनामुळे तुपकरांची प्रकृती ढासाळली
– जामिनाला पोलिस विरोध करण्यासाठी शक्यता, उद्याच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष
बुलढाणा (बाळू वानखेडे) – कापूस, सोयाबीन या पिकांची भाववाढ व पीकविम्याची रक्कम मिळण्यासाठी आत्मदहन आंदोलन करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यावतीने आज बुलढाणा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. हा अर्ज दाखल करून घेत न्यायालयाने पोलिसांना म्हणणे मांडण्यास सांगितले असून, या अर्जाला पोलिस विरोध करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, गेले तीन दिवस रविकांत तुपकर यांच्या पोटात अन्नाचा कणही गेला नसून, त्यांनी कारागृहातही अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवले आहे. शेतकर्यांवर अमानुष लाठीचार्ज करणार्या पोलिसांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत अन्नाचा कणही घेणार नाही, असा इशारा तुपकर यांनी दिला आहे. दरम्यान, हे अन्नत्याग आंदोलन लवकरात लवकर सुटले नाही तर मात्र तुपकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येणार आहे.
आत्महत्येचा प्रयत्न, दंगल भडकाविणे, सरकारी कामात अडथळा आणण्यासह गंभीर स्वरुपाचे गुन्हे बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्यावर दाखल केले आहेत. त्यामुळे बुलढाणा न्यायालयाने तुपकर यांच्यासह त्यांच्या २५ साथीदारांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, सर्वांची रवानगी अकोला कारागृहात केली आहे. दरम्यान, आज तुपकरांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. हा अर्ज न्यायालयाने दाखल करून घेत, पोलिसांना म्हणणे मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. उद्या या अर्जावर सरकारी वकील पोलिसांचे म्हणणे सादर करतील, अशी शक्यता आहे. कदाचित, पोलिस जामिनाला विरोधही करण्याची शक्यता दाट आहे.
दरम्यान, रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाबाबत व त्यांनी केलेल्या मागण्यांबाबत सरकार दरबारी अद्याप काहीच हालचाली दिसत नाहीत. शेतकर्यांच्या पीकविम्याच्याप्रश्नी एआयसी कंपनीने शेतकर्यांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. तसेच, पीक नुकसान भरपाईची रक्कमदेखील तांत्रिक अडचणी दूर करून शेतकर्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. रविकांत तुपकर हे वारंवार आत्मघाती आंदोलने करून सरकार व प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मागण्या शेतकरीहिताच्या व रास्त असल्या तरी, त्यांचा मार्ग चुकत आहे. शिवाय, त्यांना विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असल्याचा संशयही काहींना आहे. त्यामुळे तुपकर यांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे, असा सत्तेतील एका घटकांचा मतप्रवाह निर्माण झाला असल्याचेही दिसून आले आहे.
——————–