मेहकर (तालुका प्रतिनिधी) – महाविद्यालयीन युवकांमध्ये समाज सेवा करण्याचे प्रत्यक्ष कृतीयुक्त प्रशिक्षणच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दिले जाते. शिक्षण घेत असतानाच नेतृत्त्व विकास, सांघिकभावना, सेवाभा आणि सामाजिक बांधीलकी अंगी बाळगून विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे. आज युवकांपुढे बेरोजगारी आणि व्यसनाधीनतेसारखी आव्हाने उभी आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जागृत राहणे गरजेचे आहे, असे मत दुपारच्या बौद्धिक सत्रात डॉ.ज्ञानेश्वर गाडे यांनी व्यक्त केले.
निष्काम कर्मयोगी संत प.पू शुकदास महाराजश्री संस्थापित विवेकानंद आश्रमद्वारा संचालित विवेकानंद विज्ञान महाविद्यालया अंतर्गत दत्त ग्राम देऊळगाव माळी येथे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात जगद्गुरु स्वामी विवेकानंद, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा व निष्काम कर्मयोगी संत प.पू शुकदास महाराजश्रींचे प्रतिमापूज व दीपप्रज्वलन करून झाली. या बौद्धिक सत्राच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यक्रम अधिकारी प्रा.अमोल शेळके, प्रमुख मार्गदर्शक संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.ज्ञानेश्वर गाडे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा.मधुरा सातपुते, प्रा.सौरभ आंबेकर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. गाडे म्हणाले की, आपल्या शिक्षणाचा उपयोग स्वतःबरोबरच समाजासाठी झाला पाहिजे ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणे गरजेचे आहे. शिक्षण हे माणसाला प्रगल्भ बनविते. जीवन जगत असताना स्वतःपुरता संकुचित विचार बाजूला सारून तरुणांना राष्ट्र कार्यासाठी प्रेरित करण्याची आज खरी गरज आहे. मोबाईलच्या आहारी न जाता युवकांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजे,असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु.अनुजा चंद्रवंशी या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाला रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.