बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शिवजयंतीनिमित्त १७ फेब्रुवारीरोजी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. येथील जिजामाता व्यापारी क्रीडा संकुल येथे हे शस्त्रप्रदर्शन भरवण्यात येणार आहे. रायगड, कोल्हापूर येथील शिवकालीन शस्त्रे पाहण्याची संधी बुलढाणेकरांना यामाध्यमातून मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हे शस्त्र प्रदर्शन मेजवानी ठरणार आहे.
शिवकालीन शस्त्र बघण्याची त्याबाबत जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीने नेमकी ही बाब लक्षात घेऊन शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात विविध प्रकारची शस्त्रे ठेवण्यात येणार आहेत. तसेच त्यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहेत. वाघनखे कसे वापरावे, ढाल कशी वापरावी, तलवार कशी चालवावी, भाला कसा चालवावा यासह इतर महत्वाची शस्त्रे चालवण्याचे प्रात्यक्षिक बघण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थ्यांना आवाहन
जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना शस्त्र प्रदर्शन पाहण्यासाठी पाठवावे तसेच नागरिकांनी शस्त्र प्रदर्शनाची लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.शोन चिंचोले यांनी तसेच सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष व पदाधिकार्यांनी केले आहे. शिवकाळात गड- किल्ले यांची भूमिका महत्त्वाची होती. गड- किल्ल्यांमुळे स्वराज्याचे मोठ्या प्रमाणात रक्षण झाले. त्याकाळातील गड- किल्ले आजही मजबूत स्थितीत आहेत. या गड- किल्ल्यांचे चित्रप्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे.
अश्व प्रदर्शन ठरणार आकर्षण
शिवजयंतीनिमित्त अश्व प्रदर्शनसुद्धा आयोजित करण्यात आले आहे. भुसावळ, औरंगाबाद, रायगड येथून अश्व आणण्यात येणार आहेत. मारवाड, काठेवाडी, देशी, भीमथडी, राजस्थानी प्रजातीचे अश्व बघण्याची संधी बुलडाणेकरांना मिळणार आहे. हे अश्व प्रदर्शन देखील विशेष आकर्षण ठरणार आहे. याठिकाणी एक सेल्फी पॉईंट बनवण्यात येणार असून आपणास फोटोसेशन करता येईल.