वर्धा (प्रकाश कथले) – सध्याचे राज्यातील तसेच केंद्रातील सरकार सत्तेचा चुकीच्या पद्धतीने वापर करीत जनसामान्यांसह शेतकरी, युवकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. महागाईने जनसामान्यांची प्रचंड होरपळ सुरू आहे. याकरीताच तुम्हाला सत्ता दिली काय, याचा जाब विचारा तसेच संधी मिळेल तेव्हा केंद्र आणि राज्यातील सध्याचे सरकार मतदानातून बदलवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वर्ध्यातील निर्धार मेळाव्यात केले. रामनगरच्या मैैदानावर झालेल्या मेळाव्याला माजी मंत्री अनिल देशमुख, माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी आमदार सुरेश देशमुख, राजू तिमांडे, रमेश बंग, बाबासाहेब वासाडे, राजाभाऊ टाकसाळे, राज्य सरचिटणीस अतुल वांदिेले, सुबोध मोहिते, सक्षणा सलगर, नीता गजबे, सुरेखा देशमुख, अॅड.कोठारी, सुरेखा ठाकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, आज वेगळ्या परिस्थितीत आपण एकत्र आलो आहोत, अनेकांसोबत मी बोललो, त्यावेळी त्यांच्या मनातील सरकारबद्धलची नाराजी स्पष्ट झाली. सत्तेचा गैरवापर होत आहे. शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत. शेतमालाचे भाव पडत आहेत. कापसाचे भाव पडत असताना यांनी विदेशातून कापूस आणला. शेतकर्यांच्या आत्महत्या होत आहेत. महागाईने जगणे कठीण केले, पण त्याकडे सरकारला पहायला सवड़ नाही. पंतप्रधान राज्यसभेत म्हणाले, माझ्या सोबत कोणी संघर्ष करू शकत नाही. बांगला देशासारख्या लहान देशाने फळांवर आयातकर लादला, त्याला म्हणायला यांची हिंमत नाही. यालाच तुमच्या सोबत संघर्ष करायची कोणाची हिंमत नाही, असे समजायचे काय, असा खोचक टोला शरद पवार यांनी पंतप्रधानांचे नाव न घेता लगावला. तसेच त्यातून देशाबाहेर यांची काय किंमत आहे, हे कळले, असेही सांगितले. काळ्या मातीसोबत इमान राखायचे निर्णय घ्यायला सरकारला वेळ नाही. गांधीजींचा पदस्पर्श झालेला वर्धा जिल्हा, पण या जिल्ह्यातही सगळ्यांच्याच समस्या वाढत आहेत. सत्तेचा गैरवापर तर नि:संकोचपणे सुरू आहे. अनेक विरोधकांना तुरुंगात डांबून त्याच्यावर दबाब टाकला जात आहे, त्यांच्या घरांवर छापे टाकले जात आहेत. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नातेवाईकांवर १३० छापे टाकले. याकरीता तुम्हाला सत्ता दिली काय, हे विचारा आणि संधी मिळेल तेंव्हा यांना जागा दाखवा. अलीकडच्या काही निवडणुकांत मतदारांनी हे दाखवून दिलेच आहे. तोच निर्धार करीत पुढील काळात पावले टाका, असे आवाहन शरद पवार यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्याचे पक्ष सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केले. त्यांनी किमान दोन विधानसभा मतदारसंघात तसेच लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या यशाची ग्वाही दिली. निर्धार मेळाव्यात सक्षणा सलगर, सुरेखा देशमुख, माजी मंत्री अनिल देशमुख, प्राजक्त तनपुरे, माजी आमदार सुरेश देशमुख, आशा मिरगे यांनी विचार व्यक्त केले. मेळाव्याला नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
———–
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब वासाडे मंचासमोर ठेवलेल्या खुर्च्यावर बसून होते. शरद पवार यांचे त्यांच्याकडे लक्ष जाताच त्यांना मंचावर बोलावून घेतले. त्याचवेळी जिल्ह्यातील विविध वत्तäयांनी आमच्यात मतभेद नसल्याचा निर्वाळा दिला. शरद पवार यांनी सेवाग्राम येथील कार्यक्रमानंतर वर्धा शहरातील विचारवंतांसह व्यापार्यांसोबत सविस्तर चर्चा केली.
दहशतवादी `कसाब`ला जेथे डांबले, तेथेच मला डांबून तडजोडीकरीता आणला दबाव; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा वर्ध्यातील सभेत गौप्यस्फोट!
आर्थर कारागृहात जेथे दहशतवादी कसाबला डांबले, तेथेच मला डांबून माझ्यावर तडजोडीकरीता दबाब आणला, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज वर्ध्यातील राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासभेत बोलताना केला. जनतेच्या साक्षीने बोलताना वर्ध्यात त्यांची भावना जाहीर भाषणातून व्यक्त केली. कारागृहातील त्यांच्या मानसिक छळ, त्यांच्यावर आलेल्या दबावाची माहिती जनतेला दिली. इडी, सीबीआयच्या कारवाईच्या भितीने अनेक आमदार पक्षबदल करून गेले. माझ्यावर दबाब आणला जात होता. तडजोडीचा प्रस्ताव दिला गेला होता. पण मी आयुष्यभर कारागृहात राहीन पण तडजोड करणार नाही, असा ठाम निरोप दिला. अखेर न्यायदेवतेने मला न्याय दिला. न्यायालयानेच माझ्यावर केलेल्या आरोपात पुरावे नाही म्हटले. माझ्यावर १०० कोटीच्या गैरव्यवहाराचा आरोप केला गेला पण दोषारोप पत्रात त्याचा उल्लेख १ कोटी ७१ लाखांपर्यंत घसरला. न्यायालयानेही याबाबत पुरावे नाहीत म्हटले. माझ्या अनन्वित छळ केला गेला पण मी ठाम राहालो, असे अनिल देशमुख म्हणाले. २०२४च्या निवडणुकीत वेगळे चित्र दिसेल तसेच राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येईल, असा विश्वासही अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.
———————–