साेलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – कुसुर (तालुका दक्षिण सोलापूर) येथील शेतकऱ्यांना शासनाची कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदान अद्याप देण्यात आले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अगोदरच शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, अशा परिस्थितीमध्ये शासनाने कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदान थकविल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
कुसुर येथील शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेतून 25 हजार प्रोत्साहन अनुदान 43 सभासद शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आले नाही. याबरोबरच दीड लाख रुपयाची कर्जमाफीस पात्र असलेले जवळपास 14 शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली नाही. तसेच महात्मा फुले कर्जमाफी योजना राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सुरू केले. या महात्मा फुले कर्जमाफी योजनेचे 2 लाख रुपये कर्जमाफीस पात्र 6 सभासद शेतकऱ्यांची कर्ज माफी झालेली नाही.
याबरोबरच जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्सन अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. परंतु कुसुर येथील अनेक शेतकऱ्यांना या प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे अगोदरच कांद्याचे कवडी मोल दर आणि इतर शेती पिकांचे आलेले खाली दर त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीमध्ये शासनाने कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदान त्वरित जमा करावे अन्यथा उपोषण करण्याचा इशारा कुसुर येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सुनील नांगरे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन देखील माजी सहकार मंत्री तथा दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांना निवेदनाच्या माध्यमातून दिले आहे.