कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत शहरात गेली अडीच वर्षापासुन नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने एकत्र येत दररोज श्रमदान करून कर्जत शहराला स्वच्छ बनवले. याकामाला नगर पंचायतची ही तोलामोलाची साथ मिळाली व बघता बघता कर्जत शहर स्वच्छ बनले, सर्वत्र स्वच्छ शहर, सुंदर शहर म्हणून नावलौकिक मिळाले. श्रमदान करणार्या नागरिकांनी सर्व सामाजिक संघटनेच्या नावाने आज ही श्रमदान करण्याचे काम सुरूच ठेवले आहेत. कर्जत शहरात दररोज श्रमदान करणारी ही टीम सद्या मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करीत असून, लावलेल्या झाडांचे संगोपन करत आहेत, सदर टीम काही दिवस स्वच्छता ही करते. नागरिकांकडून एखाद्या ठिकाणी झालेला कचरा सर्व सामाजिक संघटनाचे श्रमप्रेमी असे ठिकाण शोधून शहरातील हा कचरा गोळा करतात, पिशव्यामध्ये भरून ठेवतात त्या पिशव्या नगर पंचायतच्या यंत्रणेने उचलून न्याव्यात, अशी अपेक्षा असते मात्र सध्या कर्जत नगर पंचायतने स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे की काय, असे पहावयास मिळत आहे. दि २८ जाने रोजी सर्व सामाजिक संघटनानी कर्जत बसस्थानक परिसरात श्रमदान करत स्वच्छता केली. परिसरातील कचरा एकत्र करून गोण्यामध्ये भरत त्या गोण्या बस स्थानकातील कचराकुंडी जवळ ठेवण्यात आल्या, हा आयता गोळा करून ठेवलेला कचरा त्याच दिवशी अथवा दुसरे दिवशी उचलून नेणे अपेक्षित असताना पाच दिवस होऊन ही हा कचरा तसाच त्याच जागेवर पडलेला असून यातील गोण्यातील कचरा पुन्हा पसरू लागला आहे. तर सामाजिक संघटनेने खास टायरची बनवलेली कुंडीही ओसंडून वाहत आहे.
स्वच्छ कर्जत मध्ये कचरा गोळा करण्यासाठी कोट्यवधी रुपयाचे टेंडर दिलेले असताना सदर यंत्रणा काम करत नसेल तर त्यावर विद्यमान नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक यांनी कमीत कमी लक्ष ठेवणे आवश्यक आहे मात्र ते पण केले जात नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माझी वसुंधरा ३ साठी नगर पंचायत मोठी तयारी करत असल्याचे दाखवत असताना प्रत्यक्ष स्थळी स्वच्छतेची ऐसीतैसी होताना त्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहे. फक्त कागदोपत्री सर्व छान छान दाखविण्यापेक्षा मूळ प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
माझी वसुंधरा ही स्पर्धा महविकास आघाडीने राबविली तर स्वच्छ सर्व्हेक्षण ही स्पर्धा भाजप सरकारने काढलेली आहे. यामुळे आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तेवर असलेले राष्ट्रवादी व काँग्रेसचे सत्ताधारी हे माझी वसुंधरा ३ ला चालना देत स्वच्छ सर्व्हेक्षण कडे दुर्लक्ष करत आहेत का हा प्रश्न उपस्थित होत असून राजकारणासाठी नागरिकांच्या लोक सहभागातून उभारलेल्या अभियानाला गालबोट लावू नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून यावर सर्व सामाजिक संघटना कोणती भूमिका घेतात याकडे ही सर्वाचे लक्ष लागले आहे.
कर्जत शहरात स्वच्छतेची चळवळ सुरू असताना अनेकदा स्वत: आ. रोहित पवार व त्याच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी अनेकदा सर्व सामाजिक संघटनाच्या श्रमप्रेमी बरोबर श्रमदान करून स्वच्छता केलेली असल्यामुळे या प्रश्नाकडे पवार कुटुंबीय तरी गांभीर्याने लक्ष घालतील असे वाटत असून, ऐका चांगल्या कामात राजकारण करणार नाहीत ही अपेक्षा आहे.