KARAJAT

कर्जत शहरात वृक्षांना लावलेल्या ४० लोखंडी जाळ्या चोरीस

कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत शहरात सर्व सामाजिक संघटनेने गेली तीन वर्ष मेहनत घेत लोकसहभागातून उभारलेल्या वृक्षारोपण अभियानातील ४० झाडाच्या जाळ्या चोरीस गेल्या असल्याची तक्रार श्रमप्रेमी नितीन देशमुख यांनी कर्जत पोलीस स्टेशनला दिली आहे.

कर्जत येथे गेली 825 दिवसांपासुन शहरातील अनेक नागरिक येत दररोज श्रमदान करून पर्यावरण रक्षणासाठी मेहनत घेत आहेत. विविध थरातील लोक एकत्र येऊन श्रमदान करत असताना या सर्व सामाजिक संघटनानी लावलेल्या झाडांचे संरक्षण करण्यासाठी मिरजगाव रोड, वालवड रोड, राशीन रोड, कापरेवाडी रोड, ढेरेमळा रोड, जुना निमगाव डाकू रस्त्यांचे दुतर्फा साठ हजारापर्यंत झाडे लावलेली असून लोकवर्गणीतून या झाडांना ताराचे कंपाऊंड केलेले आहे. या झाडाची निगा राखणे, लक्ष ठेवणे यासाठी अनेकांनी स्वयंस्फूर्तीने जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या आहेत.

मात्र निमगाव रोड वरील ४० झाडांच्या जाळ्या चोरीस गेल्याचे आज लक्षात आल्यानंतर याबाबत सर्व सामाजिक संघटनेचे श्रमप्रेमी नितीन साहेबराव देशमुख यांनी कर्जत पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असून यामध्ये म्हटले आहे की, कर्जत शहरात सर्व सामाजीक संघटनांचे माध्यमातून रोज सकाळी 06/30 ते 09/00 वाजे दरम्यान कर्जत शहर व परीसराची स्वच्छता, झाडे लावणे व झाडाचे संगोपन करण्याचे काम आमची संघटना 825 दिवसांपासुन करते. आमचे संघटनेत मी तसेच माझे इतर सहकारी विजयकुमार तोरडमल, भाऊसाहेब रानमाळ, राहुल खराडे, अशिष शेटे, तात्यासाहेब क्षिरसागर तसेच संघटनेतील सुमारे 100 लोक सदरचे कामकाज पहात असतो.

म्ही कर्जत शहरातील सदर झाडांचे संरक्षण व्हावे याकरीता प्रत्येक झाडाला लोखंडी संरक्षण जाळी तयार करुन बसवलेली आहे. आज दि. 05/01/2023 रोजी सकाळी मी तसेच आमचे संघटनेतील इतर सदस्य नागेश्वर मंदीर परीसरात स्वच्छता करत असतांना राहुल खराडे यांनी सांगितले की, मी देखभाल करत असलेले जुना निमगाव ढेरेमळा रोडचे कडेला असलेल्या झाडांच्या संरक्षण जाळ्या मागील तीन चार दिवसापासून झाडाला दिसुन येत नाहीत, असे सांगितल्याने आम्ही दोन्ही ठिकाणचे रस्त्याने जावून पाहणी करून खात्री केली असता, आम्हाला 40 झाडाच्या संरक्षण जाळ्या चोरी गेल्याचे दिसल्या. सदर चोरी गेलेल्या जाळ्यां 12,000/- रुपये किंमतीच्या असल्याचे म्हटले आहे.

पर्यावरण ही अत्यंत महत्वाची गोष्ट असून चोरी करणाऱ्या व्यक्तीला ही स्वच्छ हवा, निरोगी परिसर यांची गरज आहे, मात्र हे समजण्या तेवढी त्याची क्षमता नसते, त्यामुळे शहरातील इतर नागरिकांनी ही बाब लक्षात घेऊन या झाडांचे संगोपन करणे या जाळ्या सुरक्षित राहतील यावर लक्ष देणे गरजेचे असून, शहरातील नागरिकांनी च या बाबत सजग होण्याची गरज आहे, असे आवाहन सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!