खासगीकरणाला विरोध करणारे महावितरणचे मुजोर अधिकारी शेतकर्यांच्या मुळावर उठले!
– शेतकरी हेलपाटे मारून थकले, अखेर संतप्त शेतकर्यांची ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार
चिखली (एकनाथ माळेकर) – एकीकडे खासगीकरणाच्या विरोधात महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, अभियंते संपावर जात सरकारचे नाक दाबून आपल्या मागण्या मान्य करून घेत असताना, दुसरीकडे हेच अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्य शेतकर्यांच्या मुळावर उठल्याचे दिसून येत आहे. सिंगल फेज योजनेंतर्गत शेतवस्तीवर राहणार्या शेतकर्यांनी दोन वर्षांपासून कोटेशन भरले, वारंवार महावितरणच्या कार्यालयात हेलपाटेदेखील मारणे सुरू आहे. परंतु, अद्याप या शेतकर्यांना वीज कनेक्शन मिळालेले नाही. त्यामुळे या संतप्त शेतकर्यांनी अखेर उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर ते मेरा खुर्द रोडवर खेडेकर येथील शेतकर्यांच्या रोडला लागून जमिनी आहेत. त्यामध्ये त्यांचे जनावरांचे गोठे व राहण्याची व्यवस्था अंत्री खेडेकर येथील शेतकर्यांनी केली आहे. या शेतकर्यांनी १४ ऑक्टोबर २०२० रोजी वीज कनेक्शन मिळण्यासाठी १,२०७ रुपये महावितरणचे कोटेशन भरून रितसर पावत्या घेतलेल्या आहेत. परंतु दोन वर्षे झाली तरीसुद्धा शेतकर्यांना लाईन मिळाली नाही. आज शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाशी दोन हात करत असताना शेतकर्यांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांनी आपली शेती रोडलगत असल्यामुळे व नवीन काहीतरी व्यवसाय करण्याच्या दृष्टीने लाईनचे कोटेशन भरले, परंतु आजपर्यंत त्यांना लाईन मिळाली नाही.
शासनाच्या स्कीममध्ये आपल्याला लाईन मिळेल, या आशेने हे शेतकरी व त्यांची सुशिक्षीत मुले वीज कनेक्शनची वाट पाहात आहेत. परंतु आजपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचे वीज कनेक्शन मिळालेले नाही. शेतकरी महावितरणच्या मेरा खुर्द, चिखली व बुलढाणा येथील कार्यालयात हेलपाटे मारूनसुद्धा काही फायदा होत नाही. त्यामुळे अखेर शेतकरी व त्यांच्या सुशिक्षीत मुलांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी निवेदन सादर करत, महावितरणच्या अनागोंदी व मनमानी कारभाराविरोधात तक्रार केली आहे. या निवेदनावर मिलिंद खेडेकर, विठ्ठल गावंडे, बळीराम खेडेकर, अमोल खेडेकर, शेषराव गावंडे, दिगंबर विक्रम गावंडे, आंध्र माळेकर आदींसह शेतकरीवर्गाच्या सह्या आहेत.
————–