बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – थंडीची लाट आणि त्यातच जिल्ह्यातील काही भागात बेमोसमी पावसाने लावलेली हजेरी यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हादरला आहे. या पावसाचा तूर, हरभरा, गहू व कांदा या पिकांना मोठा फटका बसणार आहे. खामगाव, नांदुरा, शेगाव या तालुक्यातील काही भागात पाऊस, तर घाटावरील लोणार, मेहकर, सिंदखेडराजा या तालुक्यात ढगाळ वातावरण कायम होते. या विषम हवामानामुळे साथीचे रोग निर्माण होण्याचीदेखील भीती व्यक्त होत आहे.
काल रात्रीपासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावून गेले आहेत. या पावसाचा रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसणार आहे. थंडीची लाट आणि पाऊस यामुळे पिकांवर रोग पडण्याची शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून, बेमोसमी पावसाचा तूर पिकासह गहू, हरबरा आणि कांदा पिकांना मोठा फटका बसणार आहे. काल रात्री तर खामगाव, नांदुरा, शेगाव तालुक्यात विजासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. सततच्या ढगाळ हवामानामुळे तूर आणि पालेभाज्यांनादेखील फटका बसत असून, तूर पिकावर अळीचा प्रादूर्भाव पडण्याची शक्यता आहे.
चिखलीमध्ये पाऊस
वातावरणात अचानक बदल झाल्याने, चिखली शहर व परिसरात रात्रीच्यावेळी अचानक पाऊस झाला. आज सकाळपासूनच थंडी, धुके असल्याने ग्रामीण भागातील जनतेने शेकोट्या पेटवल्या होत्या. या पावसामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले असून, रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांवर अळीचा प्रादूर्भाव वाढत असल्याने उत्पन्नात घट येण्याची भीती शेतकर्यांना सतावत आहे. सद्या तुरीचे पीक सोंगणीला आले असून, खेडोपाडी ही सोंगणी सुरू आहे. ढगाळ वातावरण व पावसामुळे हातातोंडाशी आलेला हा घास हिरवला जाण्याची भीती शेतकरीवर्गाला निर्माण झाली आहे.