सोलापूर (संदीप येरवडे) – जिल्हा परिषद येथील लघु पाटबंधारे विभागाला अद्याप कोणताही विकास कामासाठी निधी आलेला नाही. त्यामुळे हा विभाग सध्या जिल्हा नियोजन समितीकडून खात्यावर कधी निधी पडेल या प्रतीक्षेत आहे. तर दुसरीकडे ठेकेदाराची मर्जी आणि आमदार, खासदार यांना हो म्हणण्या पलीकडे अधिकाऱ्यांना काय करता येत नसल्याचे दिसत आहे.
लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत पाझर तलाव दुरुस्ती, नवीन सिमेंट बंधारे बाधणे, गँबियन बंधारा, रिचार्ज बंधारा आदी कामे केली जातात. या कामासाठी जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाकडे 15 कोटी रुपयांचा निधी यावर्षी मिळणार असले तरी तो निधी अद्याप खात्यावर पडला नसल्याने सध्या प्रस्ताव घेणे एवढेच काम सध्या सुरू आहे. या कामसाठी सध्या जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाकडे प्रस्ताव येत आहेत. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून अद्याप निधी आले नसल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
ठेकेदार मारताहेत चकरा!
सध्या जलजीवन मिशन वगळता जिल्हा परिषदेमध्ये कोणत्याही विकास कामाचा कार्यारंभ आदेश मिळत नाही. त्यामुळे लघु पाटबंधारे विभागाकडे जिल्हाभरातून ठेकेदार चकरा मारत आहेत. परंतु अद्याप निधीच खात्यावर आला नसल्याने केवळ आमदार, खासदार, माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या शिफारशी घेण्यापलीकडे काही करता येत नसल्याचे दिसत आहे.
सध्या लघु पाटबंधारे विभागाकडे जिल्हा नियोजन समितीचा निधी आला नसून तो निधी पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे. निधी खात्यावर पडताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. याबरोबरच जलयुक्त शिवार योजनेची कामे देखील सुरू होण्याची शक्यता आहे.
– पंडित भोसले, जलसंधारण अधिकारी जि. प.