– अज्ञात समाजकंटकाच्या तातडीने मुसक्या आवळा; अन्यथा पोलिस ठाण्यावर मोर्चा
बिबी (प्रतिनिधी) – यापूर्वी शेतातील सोयाबीनच्या सुड्या जाळून चोरपांग्रा (ता. लोणार) येथील कष्टकरी शेतकरी विठोबा तुकाराम जायभाये यांचे अज्ञात समाजकंटकाने नुकसान केले होते. आता परवा तब्बल दोन लाखाची तुर अज्ञात समाजकंटकाने जाळून टाकली व ऐन रब्बी हंगामात जायभाये यांचे मोठे आर्थिक नुकसान केले. वारंवार गुन्हा करणार्या या आरोपीच्या तातडीने मुसक्या आवळाव्यात अन्यथा बिबी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा संतप्त शेतकरीवर्गाने दिला आहे.
सविस्तर असे, की बिबी येथून जवळच असलेल्या चोरपांग्रा तालुका लोणार येथील शेतकरी विठोबा तुकाराम जायभाये यांनी त्यांच्या चोरपांग्रा शिवारातील गट क्रमांक ५८ मध्ये तीन एकर तुरीचा पेरा केलेला होता व तूर ही काढणीला आली असता, त्यांनी तुरीची सोंगणी करून शेतामध्ये सुडी लावली होती व अज्ञात व्यक्तीने बुधवारी रात्रीच्या सुमारास ती सुडी पेटवून दिली. त्यामध्ये शेतकरी विठोबा तुकाराम जायभाये यांचे दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
विठोबा तुकाराम जायभाये हे सकाळी नेहमीप्रमाणे शेतात गेले असता, त्यांना तुरीची सुडी ही पूर्णतः जळालेली दिसली व त्यांनी लागलीच या सर्व प्रकरणाविषयीची माहिती गुरुवारी लेखी स्वरुपात बीबी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे व ज्या ठिकाणी सुडी जळालेली आहे त्या ठिकाणी श्वान पथकालासुद्धा पाचरण करण्यात आले होते. या अगोदर पण यांची दोन वेळा सोयाबीनची सुडी जाळण्यात आलेली होती, हे विशेष.
तरी या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन अज्ञात व्यक्तीविरोधात कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी विठोबा तुकाराम जायभाये व एडवोकेट योगेश जायभाये हे यांनी केली व पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल न घेतल्यास चोरपांग्रा येथील शेतकरी बिबी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार असल्याचे एडवोकेट योगेश जायभाये यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले. पुढील तपास बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार कायंदे पो. ना. सांगळे हे करीत आहेत.
—————