बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दि. ३० जानेवारीरोजी मतदान होणार आहे. यासाठी मतदारांना विशेष नैमित्तिक रजा देण्यात येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने दि. २९ डिसेंबर २०२२ च्या प्रसिध्दी पत्रकानुसार विधानपरिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. सदर निवडणुकीसाठी सोमवार, दि. ३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तसेच गुरुवार, दि. २ फेब्रुवारी २०२३ रोजी मतमोजणी होणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार, या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तीक रजा देणे आवश्यक आहे. सदरची रजा ही कर्मचार्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असणार आहे, त्यानुसार सामान्य प्रशासन विभाग विभागाच्या शासन निर्णयानुसार मतदारांना मतदानाच्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा मंजूर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी केले आहे.
————–