– बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांचा आधारवड हरपला, सर्वच स्तरातून शोकसंवेदना व्यक्त
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – ज्येष्ठ पत्रकार, बुलढाणा जिल्ह्यातील पत्रकारांचे आधारवड, तसेच सामाजिक कार्यात सतत स्वतःला झोकून देणारे व्यक्तिमत्व समाधानभाऊ सावळे यांचे मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटल येथे काल रात्री १२.२१ वाजता यकृताच्या आजाराने निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ५६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर जिल्ह्यात शोकलहर निर्माण झाली असून, राजकीय, सामाजिक, पत्रकारिता, प्रशासन अशा सर्वच क्षेत्रातून शोक संवेदना व्यक्त होत आहेत. माणसांच्या गोतवळ्यात रमणारे सदैव हसमुख व्यक्तिमत्व असे अकाली निघून गेल्याने प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे मूळगाव असलेल्या डोंगरशेवली येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी उषाताई समाधान सावळे, मुलगा राहुल व विवेक, एक मुलगी सौ.किरणताई मिसाळ, नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे.
यकृताच्या आजारामुळे समाधानभाऊ सावळे यांना मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. गेल्या १५ ते २० दिवसांपासून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टर वैद्यकीय उपचार करत होते. तर मागील काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. मुलगा विवेक (विकी)सह सर्व सावळे परिवारदेखील मुंबईत त्यांच्या सुश्रुषेसाठी होता. अलिकडेच शरीरातील संसर्ग कमी होऊन त्यांच्या प्रकृतीत सुधारणादेखील होऊ लागली होती. परंतु, अचानक त्यांची प्राणज्योत मालवल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. मुळचे डोंगरशेवली (ता. चिखली) येथील रहिवासी असलेले समाधान सावळे यांनी बुलढाणा जिल्ह्यात पत्रकारितेच्या माध्यमातून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले होते. ते बुलढाणा येथेच स्थायिक झाले होते. राजमाता जिजाऊ मुलींची सैनिकी शाळेची स्थापना करून त्यांनी मुलींसाठी लष्करी शिक्षणाचे दालन उपलब्ध करून दिले होते. विदर्भातील ही एकमेव मुलींची सैनिकी शाळा ठरली आहे. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे ते उर्ध्वयू होते. तसेच, पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक, शेतीप्रश्नांना वाचा फोडली होती.
यकृताच्या आजाराने गत काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईत वैद्यकीय उपचार सुरू होते, परंतु अखेर त्यांची मोक्षदा एकादशीच्या पर्वावर काल रात्री प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर डोंगरशेवली या त्यांच्या राहत्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम सोमवारी (दि.५) सकाळी १० वाजता डोंगरशेवली (ता.चिखली) येथेच होणार आहे. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ परिवाराच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत.
——————-