देश विकृतांच्या ताब्यात, शिवरायांचा अपमान सहन करणार नाही!
– राज्यपालांवर कारवाई झाली नाही तर आझाद मैदानावर मोर्चा
– छत्रपती उदयनराजे भोसले यांचा रायगडावर आक्रोश मेळावा
रायगड (जिल्हा प्रतिनिधी) – हा देश विकृत लोकांच्या ताब्यात गेलाय असे सांगून, देशाला स्वराज्य, सर्वधर्म समभावाचा आदर्श विचार देणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट, लिखाण व वक्तव्यांतून सातत्याने अवमान केला जात आहे. वर त्याचे समर्थन करण्याचे धाडसही दाखवले जात आहे. मात्र, आता शिवरायांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपनेते मंगलप्रभात लोढा या भाजपशी निगडीत नेत्यांकडून शिवरायांविषयी वादग्रस्त विधाने करण्यात आली. त्यावरून भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे आक्रमक झाले असून, त्यांनी राजगडवर आयोजित आक्रोश मेळाव्यात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, राज्यपालांचे समर्थन करणार्यांना लाज वाटली पाहिजे. राज्यपालांवर कारवाई व्हावी, यासाठी आता पुढील मोर्चा आझाद मैदानात काढू, अशी घोषणाही उदयनराजेंनी केली. राज्यपाल यांची उचलबांगडी होत नाही तोपर्यंत थांबणार नाही. इथे असते तर टकमक टोकावरून फेकून दिले असते, असेही उदयनराजे यांनी म्हंटले आहे.
‘निर्धार शिवसन्मानाचा’ या मेळाव्यासाठी खासदार उदयनराजे आज रायगडावर आले होते. शिवरायांच्या समाधीला वंदन करून मेळाव्याला संबोधित करताना उदयनराजेंनी राज्यपालांवर सडकून टीका केली. तसेच, भाजपवरही निशाणा साधला. यावेळी त्यांनी रायगडावर आत्मक्लेश आंदोलनदेखील सुरू केले होते. त्यांनी शिवप्रेमींना संबोधित करताना भाजप आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राज्यात राज्यपाल आहे. या लोकांना महाराजांचा अपमान करणे अंगवळणी पडले आहे. अशा विकृतीचे फावले आहे. एक बोलला म्हणून दुसरा बोलतो. कोण राज्यपाल? त्यांचे नाव घ्यायचे नाही. ते कधी मोठे नव्हतेच. राज्यपाल पद हे सर्वात मोठे आहे. ते सन्मानाचे पद आहे, कोणता प्रोटोकॉल? चुकीचे हे चुकीचे आहे. हे लोक जर समर्थन करत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. केवळ शिवाजी महाराजच नाही तर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंची खिल्ली उडवावी, असा अवमान राज्यपालांनी केला. आणि अपमान पाहत बसलो आहोत. महाराजांचा अवमान हा आपला अपमान वाटत नाही का? आपण काही करणार आहोत की नाही? या राजकारण्यांच्या किती दिवस तावडीत राहणार? आज हा देश विकृत लोकांच्या तावडीत गेला. हे सांगताना खंत वाटते, अशी वेदनादेखील छत्रपती उदयनराजे यांनी व्यक्त केली.
भीती वाटते. खंत वाटते. वेदना होतात. किती स्वार्थी आणि व्यक्ती केंद्रीत लोक झाले आहेत. लोकांमध्ये वितुष्ट जरी आले तरी चालेल पण माझा स्वार्थ साधला गेला पाहिजे. मी सत्तेत आलो पाहिजे, हा विचार महाराजांनी केला नव्हता. त्यांनी रयतेचा विचार केला होता. तुमचा आमचा विचार केला होता. शिवरायांचा अवमान करणार्या दोषींना त्यांची जागा दाखवून दिली नाही तर भावी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. आपण भावी पिढीला आदर्श काय देणार आहोत?, असा सवाल करत यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करणार आहे, गावोगावी जाऊन लोकांमध्ये याबाबत जागरुकता निर्माण करणार आहे, अशी घोषणाही उदयनराजेंनी केली. कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांचा विषय संपवा, असे आवाहन उदयनराजेंना केले आहे. त्यावर खासदार उदयनराजे म्हणाले, चंद्रकांत पाटलांचे हे वक्तव्य दुर्दैवी आहे. शिवराय आमचा स्वाभिमान आहे. तसेच, भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणार का? या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, वेळ पडल्यास शक्य ते सर्व करायला मी तयार आहे, असेदेखील त्यांनी नीक्षून सांगितले.
————–