Head linesMaharashtraPachhim MaharashtraPunePune

द्वेषाने विखुरलेल्या भारताला जोडण्याचे काम राहुल गांधी ‘भारत जोडो’ पदयात्रेतून करताहेत!

– आ. जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिपादन; अठराव्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे उद्घाटन

पुणे (प्रतिनिधी) – “गांधी परिवार, काँग्रेसला त्यागाची मोठी परंपरा आहे. काँग्रेसची विचारधारा ही प्रेमाची, आपलेपणाची आहे. देशाला एकसंध ठेवण्यात भारतीय संविधान आणि काँग्रेसची हीच विचारधारा आवश्यक आहे. आज द्वेषाने विखुरलेल्या देशाला जोडण्याचे काम राहुल गांधी भारत जोडो पदयात्रेतून करत आहेत,” असे प्रतिपादन माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. श्रीमती सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित १८ व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहाचे उद्घाटन आव्हाड यांच्या हस्ते झाले.  नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते उल्हासदादा पवार, सप्ताहाचे संयोजक, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस वीरेंद्र किराड, पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष कैलास कदम, दत्ता बहिरट आदी उपस्थित होते.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “काँग्रेसच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचा माणूस असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मात्र, संविधान वाचवण्यासाठी मिळालेल्या कोणत्याही व्यासपीठावर आपण बोलले पाहिजे. हृदयाची आणि प्रेमाची भाषा, संवाद गरजेचा आहे. आज राहुल गांधी तेच करत आहेत. स्वत्व विसरून काम करणाऱ्या राहुल गांधींचा त्याग आपण लक्षात घ्यायला हवा. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी जो त्याग केला, त्याच वाटेवर राहुल गांधी चालत आहेत. लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे काम ते करत असल्याने त्यांच्याविषयी जनतेमध्ये प्रेम, आस्था आहे. आपल्या पित्याच्या खुन्यांना क्षमा करण्याची त्यागभावना केवळ राहुल गांधींकडे आहे.” “हा देश महात्मा गांधींचा आहे आणि त्या देशाची सद्भावनेची संस्कृती आहे. मात्र, गांधींना मारणाऱ्या त्याच नथुरामचे इथे होणारे उदात्तीकरण दुर्दैवी आहे. इतिहासाचे विकृतीकरण आणि वर्ण वर्चस्ववादाचा प्रसार करण्याचा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे. चित्रपटांच्या माध्यमातून आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर होणार हल्ला आपण सहन करता कामा नये. शिवाजी महाराजांना देवत्व देऊ नये, त्यांचा कार्याचा आदर्श ठेवून काम करायला हवे. गांधी-आंबेडकर यांच्यातील संबंध खूप चांगले होते. त्यांच्यात मतभेद जरूर होते. मात्र, देशहितासाठी त्यांनी कायम एकत्रित काम केले. खरा इतिहास आपण नव्या पिढीला सांगितला पाहिजे. गांधी-नेहरू-आंबेडकर या तिघांनी दूरदृष्टीने देशाची रचना केली. अनेक संस्था निर्माण केल्या. इंदिरा गांधींनी देशाला सक्षम केले. काँग्रेसच्या विचारधारेतून हे सगळे झाले आहे. त्यामुळे काँग्रेसने काय केले? हा प्रश्न विचारणाऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी इतिहास पाहावा,” असे स्पष्ट मत जितेंद्र आव्हाड यांनी मांडले.

उल्हासदादा पवार म्हणाले, “सेवा, कर्तव्य आणि त्यागाची गांधी घराण्याची परंपरा आहे. ‘भारत जोडो’ मधून खऱ्या अर्थाने ‘मन की बात’ होत आहे. सत्याची जाण नसलेल्या, खोटेपणाचा बुरखा पांघरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनतेने डोळे तपासणी करण्याची गरज आहे. एका वेगळ्या परीपेक्ष्यातून देश जात असताना आजच्या स्थितीत निर्भय लोकांची गरज आहे.” स्वागत प्रास्ताविकात मोहन जोशी म्हणाले, “समाजातील सर्व घटकांना जोडणारे विविध कार्यक्रम शहराच्या विविध भागात होत आहेत. अशा अभिनव कार्यक्रमाच्या माध्यमातून सोनियाजीना शुभेच्छा देण्याचा आमचा प्रयत्न करतो आहोत.” अनिता देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. वीरेंद्र किराड यांनी आभार मानले.

सप्ताहाचे आव्हाडांकडून कौतुक
गेली १८ वर्षे मोहनदादा जोशी या सप्ताहाच्या माध्यमातून गांधी परिवाराच्या त्यागाची, सेवेची आणि कर्तव्यभावनेने केलेल्या कामाची परंपरा लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. काँग्रेसच्या प्रेमाच्या, सद्भावनेच्या विचाराने समाजातील सर्व घटकांसाठी नाविन्यपूर्ण व उपयुक्त असे उपक्रम राबवत आहेत. सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त खऱ्या अर्थाने दिलेल्या या कृतियुक्त शुभेच्छा आहेत, अशा शब्दांत आव्हाड यांनी जोशी यांचे कौतुक केले.


राज ठाकरे जातीद्वेष पसरवणारे!

जाती धर्माच्या नावाखाली द्वेष पसरवण्याचे काम राज ठाकरे यांच्याकडून वारंवार केले जात आहे. मग ते इतिहासाचे दाखले देऊन असो की, भोंग्याचा प्रश्न उपस्थित करून. शरद पवार यांनी कधीही जाती-धर्मात द्वेष पसरवण्याचे पाप केले नाही. समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन चालण्याची काँग्रेसची आणि शरद पवार साहेबांची विचारधारा आहे, असे कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!