लातूर (जिल्हा प्रतिनिधी) – कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना जनजागृती करणे आणि प्रबोधन करण्यासाठी प्रâंट लाईनला राहून कार्य करणार्या दोन पोलीस पाटलांच्या मृत्यूनंतर सानुग्रह अनुदान म्हणून शासनाच्यावतीने दिले जाणारे अर्थसाह्य लातूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. यावेळी कोरोनाबळी ठरलेल्या दोन पोलिस पाटलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख असा एक कोटीचा धनादेश प्रदान करण्यात आला.
राज्यात सन २०२०-२१ या वर्षांमध्ये कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. राज्यातील पोलीस दल कोरोना विरुद्ध लढाईत आपले कर्तव्य बजावत असताना, पोलिसांच्या बरोबरीने गाव पातळीवरील पोलीस पाटलांनीही आपल्या प्राणाची परवा न करता आपले कर्तव्य बजावले होते. कर्तव्य बजावत असताना पोलिसांसोबतच काही पोलीस पाटलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोरोना काळात कर्तव्य बजावत असताना दुर्दैवी मृत्यू झालेल्या इतर शासकीय नोकरदारांप्रमाणेच गाव पातळीवर काम करणारे पोलीस पाटील यांच्या वारसदारांना सानुग्रह साह्य अनुदान म्हणून प्रत्येकी ५० लाख रुपये प्रदान करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील पोलीस पाटील दिवंगत श्रीरंग गोविंदराव पाटील (राहणार नदीवाडी, तालुका निलंगा जिल्हा लातूर) व दिवंगत भागवत रामराव गुट्टे (राहणार येलदरवाडी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर) हे आपले कर्तव्य बजावत असताना कोरोनाचे संक्रमण होऊन आजारी पडल्याने त्यांचा वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. नमूद दिवंगत पोलीस पाटलांचा सानुग्रह सहाय्य प्रस्ताव पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या निर्देशान्वये पोलीस अधीक्षक कार्यालयातील कार्यालय अधीक्षक फुलचंद बनसोडे, प्रमुख लिपिक संभाजी कोलगणे, वरिष्ठ लिपिक राजेश्वर कुलकर्णी यांनी कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करून पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे मार्फतीने महाराष्ट्र शासनाला सादर करून प्रत्येकी ५० लाख रुपयाची रक्कम मंजूर करून घेतली.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दोन्ही दिवंगत पोलीस पाटलांचे वारस पत्नींना ५०-५० लाख रुपयाचे धनादेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्याहस्ते प्रधान करण्यात आले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी नमूद पोलीस पाटलांच्या वारसांना त्यांना भविष्यात काही अडचणी आल्यास लातूर पोलीस सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहून सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. यावेळी पोलीस उपाधीक्षक (गृह) अंगद सुडके, कार्यालय अधीक्षक फुलचंद बनसोडे, प्रमुख लिपिक संभाजी कोलगणे, वरिष्ठ लिपिक राजेश्वर कुलकर्णी, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील उपस्थित होते.
——————