हिवरा आश्रम, जि. बुलढाणा (प्रतिनिधी) – निष्काम कर्मयोगी संत व मानवसेवेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातकीर्त असलेल्या विवेकानंद आश्रम या संस्थेचे संस्थापक पू. शुकदास महाराज यांचा ८०वा जन्मोत्सव हिवरा आश्रम येथे विविध सेवाभावी व सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांनी पार पडला. मोफत रोगनिदान शिबिराचा १२०० रुग्णांनी लाभ घेतला तर, ६०हून अधिक तरुणांनी रक्तदान केले. बालवैज्ञानिकांनी तब्बल दिडशे वैज्ञानिक प्रयोग सादर करून विज्ञान प्रदर्शनीही यशस्वी केली.
विवेकानंद आश्रमाचे संस्थापक निष्काम कर्मयोगी संत प. पू. शुकदास महाराज यांचा ८० वा जयंती सोहळा अत्यंत भक्तीभावाने व उत्साहाने संपन्न झाला. या सोहळयासाठी राज्यभरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी १० वाजता महाराजांच्या समाधीस्थळी शेकडो भाविकांच्या उपस्थित त्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. सकाळी ग्रामसफाई व दिंडी प्रदिक्षणा करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. व्यासपीठावरील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे ४० शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जीवन विकास विद्यालय दुसरबीडची विद्यार्थी कु.वैष्णवी विजय खरात, व्दितीय शिवाजी हायस्कुल मेहकरची विद्यार्थी हर्षदा गणेश रहाटे, तृतीय क्रमांक जवाहर विद्यालय शेगावची विद्यार्थीनी कु.त्रिशा संतोष सोळंके यांनी मिळविला. सकाळी ११ वाजता ग्रामीण रूग्णालयात भव्य रोगनिदान संपन्न झाले.
या शिबीराला अनेक रोगाचे तज्ञ डॉक्टरांनी सेवा प्रदान केली. या मोफत शिबीरात १२०० रूग्णांनी आपली तपासणी करून घेतली. ग्रामीण रूग्णालयात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ६० हून अधिक तरूणांनी रक्तदान करून हा कार्यक्रम यशस्वी केला. विवेकानंद विद्या मंदिरात विज्ञान प्रदर्शनीत १५० बालवैज्ञानिकांनी आपले नाविन्यपूर्ण उपकरणे सादर केली. रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, ग्रंथप्रदर्शन इत्यादी शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विवेकानंद ज्ञानपीठात आनंदमेळा संपन्न झाला. त्यामध्ये बालगोपालांनी बनवून आणलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला. अपंग विद्यालयात हस्तकला व वर्गसजावटीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी विवेकानंद विद्या मंदिराच्या विस्तारीत इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. कोराडी जलाशयातील विवेकानंद स्मारकावर जाऊन भाविकांनी स्वामीजींच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. यावेळी बोटीचा प्रवास व निसर्गरम्य परिसराचा त्यांनी आनंद घेतला. हरिहर तीर्थावरील नयनरम्य गार्डन व भव्य मंदिरातील भगवान बालाजी व भगवान शंकराचे दर्शन घेतले. तसेच आज दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.