Breaking newsBULDHANAHead linesMaharashtraMEHAKARPoliticsVidharbha

रविकांत तुपकरांसाठी माजी मंत्री सुबोध सावजी मैदानात!

– तुपकरांचा आवाज दाबणं म्हणजे शेतकर्‍यांचा आवाज दाबणं, पोलिसांनो, हे पाप करू नका – सावजी

मुंबई/बुलढाणा (संतोष थोरहाते) – सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मुंबई येथे अरबी समुद्रात शेतकर्‍यांसह जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. तर, अशा कितीही नोटिसा आल्या तरी मागे हटणार नाही, अशा इशारा तुपकर यांनी दिलेला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते सुबोध सावजी यांनी, मैदानात उतरत, तुपकरांना नोटिसा बजावून, पोलिसांना त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये. तुपकरांचा आवाज दाबणे म्हणजे, शेतकर्‍यांचा आवाज दाबणे आहे, अशा शब्दांत सावजी यांनी पोलिस आणि राज्य सरकारला ठणकावले आहे.

मुंबई येथे अरबी समुद्रात २४ नोव्हेंबरला जलसमाधी आंदोलन तुपकर यांनी जाहीर केले आहे. या आंदोलनामुळे बुलडाणा जिल्ह्यासह मुंबई व इतर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर स्वरूपाचा प्रश्न उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण आंदोलन करू नये, अशा स्वरूपाची नोटीस बुलडाणा शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी बजावली आहे. त्यावर रविकांत तुपकर हे चांगलेच आक्रमक झालेले असून, पोलिसांच्या माध्यमातून नोटिसा पाठवून सरकार शेतकर्‍यांचे आंदोलन दडपण्याचे प्रयत्न करीत आहे. पोलिसांनी आडवा-आडवी केल्यास सरकारला महागात पडेल. विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीन, कापूस उत्पादकांचा हा लढा आहे. आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा तुपकरांनी यापूर्वीच पोलिसांना दिलेला आहे.

दरम्यान, आज माजी मंत्री सुबोध सावजी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या माध्यमातून पोलिसांना चांगलेच ठणकावले आहे. आपण पोलीस यंत्रणेला आव्हान करतो, की रविकांत तुपकर यांना दिलेल्या नोटीसा वापस घ्या. कारण ते शेतकर्‍यांसाठी लढणारे नेते आहेत. त्यांना नोटीस देणे म्हणजे शेतकर्‍यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे, त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करु नका, अशा शब्दांत सुबोध सावजी यांनी पोलिसांना ठणकावले आहे.


दरम्यान, जलसमाधी आंदोलनावर ठाम असलेल्या रविकांत तुपकर यांनी सांगितले, की २३ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता बुलडाणा येथून वाहनांचा ताफा मुंबईकडे रवाना होईल. २४ तारखेला सकाळी १० वाजता मंत्रालयाशेजारी गिरगाव चौपाटीवरुन समुद्रात जलसमाधी घेतील. तुपकर यांच्या आंदोलनाच्या इशार्‍यामुळे पोलिसांसह सरकारी यंत्रणांत खळबळ उडाली आहे. त्यांना मुंबईत प्रवेश करण्यापासून रोखण्याच्या हालचाली पोलिसांनी चालविल्या होत्या.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!