KOLHAPUR

ओला दुष्काळ जाहीर करा, शिवसैनिकांचा महामार्गावर ठिय्या!

कोल्हापूर (शिवानी प्रभावळे) – कोल्हापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने शिवसैनिकांनी कोल्हापूर-सांगली महामार्गावर आज ठिय्या आंदोलन केले. शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना आणि ग्रामीण भागाला न्याय देण्यासाठी राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकर्‍यांना ५० हजार , तर शेतमजुराना प्रती दिन ३०० रुपये मिळावेत, अशी मागणी शिवसैनिकांनी केली. शेतकरी अडचणीत असताना शासन त्यांना मदत करत नाही, असे म्हणत अरुण दुधवडकर यांनी राज्य सरकारवर टिका केली. लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर केला नाही, तर पंधरा दिवसांनी उग्र आंदोलन करण्यात येईल आणि त्यावेळी जबाबदारी सरकारची राहील, असा इशारा देखील दिला. शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले, कृषिमंत्री कोल्हापुरात आल्यावर कोल्हापुरी पायताणाचा प्रसाद देऊ. राज्य सरकारने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अजून ही शेतकर्‍यांना भरपाई मिळालेली नाही. जोपर्यंत ओला दुष्काळ जाहीर होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.

दरम्यान, यावेळी काही काळानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ही दडपशाही असल्याचा आरोप मुरलीधर जाधव यांनी केला. यावेळी तहसीलदारांनी आंदोलन स्थळी भेट दिली. तसेच या बाबत प्रशासनाशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, मधुकर पाटील, साताप्पा भवन यांच्यासह अनेक शिवसैनिक आंदोलनात सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!