Breaking newsKOLHAPURMaharashtraPachhim MaharashtraPolitical NewsPolitics

सोयाबीन, कर्जमाफीच्या मुद्द्यावर लवकरच मराठवाड्यात दौरा!

– शेट्टी यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; हातकणंगलेमध्ये शिवसेनेचा पाठिंबा हवा?
– बुलढाण्यातून रविकांत तुपकरांनी संघटनेमार्फत लढावे, आम्हाला आनंदच – शेट्टी

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – केंद्र सरकारने अदानीवरील प्रेमापोटी आयात होणार्‍या खाद्यतेलावर पाच टक्के आयात शुल्क कमी केल्याने सोयाबीनला भाव नाही. सन २००० मध्ये चार हजार भाव होता. आज २०२३ उलटून गेला तरी तोच भाव आहे. सोयाबीनच्या प्रश्नावर, कर्जमाफीच्या मुद्द्यावर मराठवाड्यामध्ये दौरा सुरू करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. काल शेट्टी यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जात भेट घेतली. ही भेट अराजकीय असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले असले तरी, आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात ठाकरे यांचे सहकार्य मिळावे, यासाठी ही भेट असल्याचे राजकीय सूत्राने सांगितले आहे. बुलढाण्यात रविकांत तुपकर हे संघटनेमार्फत निवडणूक लढले तर आम्हाला आनंदच आहे. आमचीदेखील हीच इच्छा आहे, असेही राजू शेट्टी यांनी यावेळी म्हटले आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जाण्याचा कोणताही विचार नसून, स्वतंत्रपणे सहा जागा लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. परंतु, आजपर्यंतचा राजकीय अनुभव पाहाता, शेट्टी हे अशी घोषणा करतात आणि ऐनवेळी ते एखाद्या आघाडी किंवा युतीसोबत जात असतात. आतादेखील ते स्वतंत्र लढणार असल्याचे सांगत असले तरी त्यांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट ही राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे. तथापि, ही भेट केवळ शेतकर्‍यांच्या प्रश्नावर घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांची ती भूमिका आहे. हुकूमशाहीच्या विरोधात जे सोबत येतील ते महाविकास आघाडीत असतील, असे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. शेट्टी यांनी काल (मंगळवारी) मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधनाता शेट्टी म्हणाले, की शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांबद्दल जोपर्यंत महाविकास आघाडीकडून काही स्पष्टीकरण मिळत नाही, तोपर्यंत कुठलाही विचार करणार नाही. उद्धव ठाकरेंसोबतची भेट राजकीय विषयावर नव्हती, तर शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर भेटल्याचे सांगून राजू शेट्टी म्हणाले, उद्धव ठाकरेंनी अदानी उद्योग समूहाविरोधात लढाई सुरू केली आहे. केंद्र सरकारने अदानीवरील प्रेमापोटी आयात होणार्‍या खाद्यतेलावर पाच टक्के आयात शुल्क कमी केल्याने सोयाबीनला भाव नाही. सन २००० मध्ये चार हजार भाव होता. आज २०२३ उलटून गेला तरी तोच भाव आहे. सोयाबीनच्या प्रश्नावर, कर्जमाफीच्या मुद्द्यावर मराठवाड्यामध्ये दौरा सुरू करणार आहे. अदानी उद्योग समूह सिंधुदुर्गात २१०० मेगावॅटची वीजनिर्मिती करणार आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सीमाभागातील जनतेला शेतीला कमी पाणी मिळणार आहे. या विरोधातही आम्ही आंदोलन सुरू करणार आहोत. सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरातील जनतेने एकत्र मिळून हा लढा उभारला पाहिजे. त्यासाठी आम्ही संघर्ष समितीदेखील स्थापन केली असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र राजकीय आघाडीबाबत आपली कोणतीही चर्चा झालेली नसून आपण स्वतंत्रपणेच निवडणूक लढणार असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.


स्वाभिमानी शेतकरी संघटना ही राज्यात सहा जागांवरून निवडणूक लढवणार असून यामध्ये हातकणंगले , कोल्हापूर , सांगली,  माढा ,परभणी आणि बुलढाणा हे लोकसभा मतदारसंघ असून स्वबळावर आम्ही निवडणूक लढवू.  बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून रविकांत तुपकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत निवडणूक लढवत असतील तर त्याचा आम्हाला आनंद असून, आमची ही तीच भूमिका आहे. मत मतांतर असणं हा लोकशाहीचा एक भाग आहे. एखाद्या संघटनेत वेगळ्या मताचे लोक असतील तर आश्चर्य वाटून घेण्याचे काय कारण आहे. मात्र, रविकांत तुपकर यांनी संघटना सोडणार नाही, असे आधी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते उमेदवार असतील तर आमची काहीही हरकत नसेल, असेही राजू शेट्टी यावेळी म्हणाले.


हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. या मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने हे शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे येथे ठाकरे गटाला सक्षम उमेदवार हवा आहे. मात्र, सध्या तरी धैर्यशील माने यांना लढत देऊ शकेल असा सक्षम उमेदवार ठाकरे गटाकडे दिसत नाही. त्यासाठी राजू शेट्टी पर्यायी उमेदवार असू शकतात. त्यांना शिवसेनेचा पाठिंबा मिळाला किंवा ते महाविकास आघाडीत सामील झाले, तर त्यांना चांगले पाठबळ मिळू शकते, याची कल्पना राजू शेट्टी यांना आहे. त्यामुळे या जागेवरून चर्चा करण्याच्या दृष्टीने राजू शेट्टी यांनी ठाकरे यांची भेट घेतली असावी, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. यावरून पुन्हा ते महाविकास आघाडीत येण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!