Breaking newsBuldanaHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

बुलढाण्यातून लोकसभा लढणार, अन् जिंकणार!

– ही आता राजवाडाविरूद्ध गावगाडा लढाई, बळीराजा ‘नोटही देईल अन् व्होट’ही देईल!

बोरीअडगाव/ बुलढाणा (बाळू वानखेडे) – हे सरकार शेतकरीविरोधी आहे, शेतकर्‍यांचा आवाज दिल्ली दरबारी पोहोचविण्यासाठी बुलढाण्यातून लोकसभा निवडणूक लढणार असून, जिंकणारही आहे, अशी घोषणा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज (दि.०१) बोरीअडगाव (ता. खामगाव) येथून केली. खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकर्‍यांना नुकसान भरपाई व पीकविम्याची रक्कम द्यावी, या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून बोरी अडगाव येथे शेतकरी प्राणांतिक उपोषणास बसलेले आहेत. या शेतकर्‍यांची भेट घेऊन तुपकरांनी त्यांना पाठिंबा दिला, तसेच उद्या मोर्चा काढण्याचा इशाराही दिला. याप्रसंगी तुपकरांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा करण्यासह ही लढाई आता ‘राजवाडाविरूद्ध गावगाडा’ अशी राहील, असे ठणकावून सांगितले.

खामगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा व शेतकर्‍यांना हेक्टरी मदत व पीक विमा देण्यात यावा, सक्तीची वसुली थांबवावी, या मागण्यांसाठी बोरी अडगाव येथील श्याम कीर्तने, वासुदेव बोहरपी, किशोर तायडे, विठ्ठल ठाकरे, गजानन नाईक, विठ्ठल घोंगे, मुरलीधर ठाकरे या शेतकर्‍यांनी २७ डिसेंबरपासून प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे. पाच दिवस झाले तरी या उपोषणाकडे लोकप्रतिनिधी, अधिकारी फिरकले नाहीत. या शेतकर्‍यांपैकी दोघांची प्रकृती खालावली असून, त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत उपोषण आधिक तीव्र करू, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. सरकार व लोकप्रतिनिधी या उपोषणाची दखल घेत नसल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली, तसेच उद्या खामगावात मोर्चा काढण्याचा इशारा दिला. यावेळी त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले. ते म्हणाले, की शेतकरी हा सरकारच्या अजेंड्या वरच नाही. शेतकर्‍यांना मारून त्यांना खाईत लोटायचे असा चंग सरकारचा असून, असे चित्र संपूर्ण महाराष्ट्रातले आहे. या शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे बघायला शासनाचे लक्ष नाही. जर या शेतकर्‍यांच्या उपोषणाबाबत तोडगा निघाला नाही, तर बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी या आंदोलनाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरतील, पुढार्‍यांना गावात येऊ द्यायचे की नाही याचाही विचार आम्ही करणार आहोत, असे सांगून उपोषणकर्त्यांची जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक लावली आहे, त्यात तोडगा निघाला नाही तर मात्र खामगावात जोरदार मोर्चा काढणार आहोत, असा इशाराही तुपकरांनी दिला आहे.


कोणत्याच पक्षाकडे तुपकरांच्या तोडीसतोड उमेदवार नाही, शेतकर्‍यांचा लढवय्या आवाज निश्चितपणे लोकसभेत जाणार!

बुलढाणा लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली असली तरी, त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवावी, अशी बुलढाणा जिल्ह्यातील पूर्वीचीच जनभावना आहे. विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्याविरोधात असलेले जनमत आणि कोणत्याही राजकीय पक्षाकडे लोकसभेसाठी नसलेला सक्षम उमेदवार ही तुपकरांची जमेची बाजू आहे. निवडणूक लढविण्यासाठी तुपकरांसारखा शेतकरी नेता लोकसभेत जाणे गरजेचे आहे, हे जिल्हावासीयांना माहिती असल्याने तुपकरांची खेडोपाडी जोरदार लाट आहे. निवडणुकीसाठी लागणारा निधीदेखील शेतकरी तुपकरांच्या झोळीत टाकत आहेत. ‘आम्ही नोटही देऊ, अन् व्होट’ही देऊ, अशी जिल्ह्यातील शेतकर्‍यांची भावना असल्याने तुपकर हे आजच मोठ्या मताधिक्क्याने बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून जातील, असे राजकीय चित्र आहे.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!