– मुंबई शहर पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती, तातडीने रूजू हाेण्याचे आदेश
मुंबई (प्राची कुलकर्णी) – सोलापूरच्या पोलिस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, नगरचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना अखेर पोस्टिंग मिळाली असून, त्यांना मुंबई शहर पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती मिळाली आहे. राज्यातील १०९ पोलिस अधिकार्यांना आज गृहविभागाने पदस्थापना दिली आहे. बदली झालेल्या व पदस्थापना झालेल्या अधिकार्यांना तात्काळ रूजू होण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, मनोज पाटील, तेजस्विनी सातपुते, बापू बांगर यासारख्या जनतेतील आणि ग्रामीण महाराष्ट्राचा चांगला अभ्यास व माहिती असलेल्या कर्तबगार अधिकार्यांना ‘साईड पोस्टिंग’ मिळाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती.
राज्य सरकारने पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु केली असून, राज्याचा कायदा व सुव्यवस्थेचा भाग पाहाता, १०९ पोलिस अधिकार्यांना तातडीने पदस्थापना देत गृहविभागाने तात्काळ रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय व राज्य पोलिस सेवेतील अधिकार्यांच्या बदल्या आणि प्रतीक्षेतील अशा एकूण १०९ अधिकार्यांना आज गृह विभागाने पदस्थापना दिली. सोलापूरचे तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची नेमणूक मुंबई शहर उपायुक्तपदी झाली आहे. तर मनोज पाटील यांनाही तेथेच पदस्थापना देण्यात आली आहे. तसेच केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या स्वप्ना गोरे यांची बदली पिंपरी चिंचवड येथे पोलिस उपायुक्त म्हणून करण्यात आली आहे. तर पालघरचे अप्पर पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड आणि नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीचे पोलिस अधीक्षक दीपाली काळे यांची सोलापूर शहर पोलिस उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. काही अधिकार्यांच्या बदल्या होऊनही त्यांना पदस्थापना मिळालेली नव्हती. अखेर त्यांना गृह विभागाने त्यांची प्रतीक्षा संपवत पदस्थापना दिली आहे.