आदित्य ठाकरेंच्या बुलढाणा, मेहकरात ‘रेकॉर्ड ब्रेक’ सभा!
– मी आमदारकीचा राजीनामा देतो, ४० गद्दार आमदारांनीही राजीनामा द्यावा-ठाकरेंचे बंडखोर आमदारांना आव्हान
– नाव प्रताप पण जिल्ह्याला मनस्ताप – खा. अरविंद सावतांची प्रतापराव जाधव यांच्यावर बोचरी टीका
बुलढाणा/मेहकर (एकनाथ माळेकर) – मी राजीनामा देतो, आणि गद्दार ४० आमदार व १२ खासदारांनीदेखील राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावून दाखवावे. बघू कोण निवडून येतो, अशा शब्दांत शिवसेना युवा सेनेचे प्रमुख तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह खासदारांना आज बुलढाणा व मेहकर येथील शेतकरी संवाद यात्रेत जोरदार आव्हान दिले. यानिमित्त ठाकरे यांच्या रेकॉर्डब्रेक सभा झाल्या. मेहकर येथील संवाद यात्रेत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी तर, नाव प्रताप आहे पण जिल्ह्याला मनस्ताप आहे, अशा शब्दांत शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर बोचरी टीका केली. ठाकरे यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्यांनी यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील मढ गावात शेतकर्यांच्या बांधावर पोहोचत, शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी केली व शेतकर्यांना दिलासा दिला. महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या हक्कासाठी व्यापक आंदोलनाचा इशारादेखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला.
मेहकर येथील शेतकरी संवाद यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार टीकास्त्र डागले. ते म्हणाले, की मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो आणि ४० गद्दारांनी राजीनामा द्यावेत, होऊन जावू द्या! ऋतुजा लटके विजयी झाल्याने आता आमचे १६ आमदार झाले आहेत. ४० गद्दार आमदार पळून गेलेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये मुख्यमंत्री कोण ते समजत नाही, गद्दारचा शिक्का कपाळावर घेऊन ते फिरतायत, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांचा गद्दार असा उल्लेख केला. शेतकर्यांची २ लाखापर्यंतची कर्ज आमच्या सरकारने माफ केली. राज्यात साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक आणली, मला शेतातील जास्त कळत नाही, पण शेतकर्यांचे दु:ख कळते, उद्धवजी असते तर ओला दुष्काळ जाहीर झाला असता असे सांगत आदित्य ठाकरे यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खूर्ची खाली करा अशी मागणी केली. राज्यात अजूनही शेतीचे पंचनामे झालेले नाहीत, दिवाळीच्या शिधा वाटपातही घोटाळा झाला असून त्यावरही आम्ही आवाज उठवणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
मेहकर येथील सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. या गर्दीने या सभेचे आयोजक आशिष रहाटे आणि किशोर गारोळे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसून आले. मेहकर हे खासदार प्रतापराव जाधव व आमदार डॉ. संजय रायमुलकर यांचे होमग्राउंड असताना, शिवसेनेच्या ठाकरे गटाने या दोन्ही नेत्यांना घरातच आव्हान दिल्याचे दिसून आले. यावेळी व्यासपीठावर असलेल्या खासदार अरविंद सावंत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांचीदेखील घणाघाती भाषणे झाली. त्यांनी शिंदे – फडणवीस सरकारसह मोदी सरकार, बंडखोर आमदार यांचा चांगलाच समाचार घेतला.बाळापूरचे आमदार नितीनबापू देशमुख, नंदू कर्हाडे, वसंतराव भोजने, दत्ता पाटील, छगन मेहेत्रे, निंबाजी पांडव यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती.
बुलढाणा येथील सभेत आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांना ओपन चॅलेंज केले. बाजूला एक गद्दार आमदार आहेत, ते चून चून के मारण्याची भाषा करतात. मी तुमच्या मतदारसंघात एकटाच येतो, तुम्ही समोरून एकटे या. एवढे चूनचून के मारण्याची हिंमत असती तर तुम्ही छातीवर वार केले असते, पाठीत खंजीर खुपसला नसता. बंड करायला हिंमत लागते, तुम्ही डरपोक आहात, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी संजय गायकवाड यांना बुलढाण्यात येऊन दम भरला. राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, त्यासाठी तयार रहा असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांसह बुलढाणेकरांना केले.
अब्दुल सत्तारांच्या त्या वक्तव्याचा निषेध!
काही महिन्यातच हे सरकार कोसळणार, लवकरच निवडणुका लागणार आहेत, तयार राहा असे आदित्य ठाकरे यांनी सांगून, अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताईंविषयी वापरेला शब्द अत्यंत घाणेरडा आहे. केंद्र सरकारला अशी लोकं कशी चालतात, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
————–