मंत्री अब्दुल सत्तारांची खा. सुप्रिया सुळेंवर खालच्या पातळीवर टीका, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सत्तारांच्या घरावर दगडफेक!
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तारांना झापले, माफी मागण्याचे दिले आदेश!
– महाराष्ट्र पेटून उठताच मंत्री सत्तारांनी मागितली खा. सुळे यांची माफी
औरंगाबाद/मुंबई (प्रतिनिधी) – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर त्यांचे आई-वडिल संस्कार करायचे विसरले असावेत, असे दृश्य संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार व राज्यातील जबाबदार महिला नेत्या सुप्रिया सुळे यांना या सत्तारांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना चक्क ‘भिकारी’ हा शब्दप्रयोग केला. अतिशय आक्षेपार्ह शब्दांत खा. सुळे यांच्याबद्दल बोलल्यानंतर महाराष्ट्र संतप्त झाला असून, ठीकठिकाणी तीव्र संताप व्यक्त होत आहे. सिल्लोड येथे राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मंत्री सत्तारांच्या बंगल्यावर दगडफेक केली. तिकडे मुंबईतही कार्यकर्ते सत्तारांच्या बंगल्यावर चालून गेले. मुख्यमंत्री शिंदे यांनी याप्रकरणी तातडीने आपल्या गटाची बैठक घेत, सत्तारांना फोन करून झापले व खा. सुळे यांची माफी मागण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर सत्तारांनी खा. सुळे यांची माफी मागत, शब्द मागे घेत असल्याचे सांगितले. सत्तार यांच्याविरोधात मुंबईत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, औरंगाबाद, बीडसह राज्याच्या विविध भागात तीव्र आंदोलन करण्यात येत होते.
काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी एका ‘मनुवादी’ नेत्याच्या पिलावळी काही तरी आक्षेपार्ह वक्तव्ये, भानगडी करून राज्याचे लक्ष आपल्याकडे वळून घेतील, अशी अटकळ बांधली जात असतानाच, आज राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे हीनदर्जाचे व आक्षेपार्ह वक्तव्य आले. खा. सुप्रिया सुळे यांच्यावर सत्तार यांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभर आंदोलन केले जात आहे. कार्यकर्ते इतके संतापले आहेत की त्यांनी सत्तार यांच्या सिल्लोड येथील राहत्या घरावर दगडफेक केली, तसेच मुंबईतील घराच्या काचा फोडल्या. राष्ट्रवादीकडून सत्तार यांनी माफी मागावी. तसेच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी पत्र लिहून करण्यात आली. राज्यातील जनमतदेखील संतप्त झालेले पाहून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांना फोन करून माफी मागण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर सत्तार यांनी खा. सुळे यांची माफी मागत, आपले शब्द परत घेत असल्याचे मीडियासमोर येवून सांगितले. मी कोणत्याही महिलेबाबत वक्तव्य केलेलं नसून जर कोणत्या महिलेचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो, असं अब्दुल सत्तार म्हणाले. कोणत्याही महिलेबाबत असं वक्तव्य केलेलं नाही, मी सरसकट सगळ्यांबद्दल बोललो, पण जर कुठल्या महिलेच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यावरून आक्रमक झाली आहे. पुढच्या २४ तासांमध्ये अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा राष्ट्रवादीच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर उद्योगमंत्री आणि त्यांचेच सहकारी उदय सामंत यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. अब्दुल सत्तार यांनी वापरलेल्या शब्दाचं मी समर्थन करत नाही. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात, मात्र अब्दुल सत्तार यांनी टीका करताना चुकीचा शब्द वापरला, असे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले.
————–