चिखली (विशेष प्रतिनिधी) – हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून मेरा खुर्द गावाची ओळख आहे. या गावाची ही ओळख संपूर्ण जिल्हाभरात असून, त्यापासून इतरांनीदेखील प्रेरणा घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी पालकमंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. चिखली तालुक्यातील मेरा खु. येथे दिनांक ६ नोव्हेंबररोजी महबूब सुहाना यांच्या यात्रेनिमित्त संदलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संदलनिमित्त सायंकाळी सात वाजता महाप्रसाद व कवलशाकीर जाकीर गुलाम चिस्ती औरंगाबाद यांच्या कवालीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे उपस्थित होते. याप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. शिंगणे म्हणाले, की मेरा खुर्द हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे माहेरघर आहे. या गावांमध्ये हिंदू, मुस्लिम सर्व जातीधर्माचे लोकं गुण्यागोविंदाने राहतात. कोणत्याही समाजाचा कार्यक्रम असला तर सर्व समाजातील लोक आवर्जून कार्यक्रमांमध्ये येतात, असेही ते म्हणाले. मेरा खुर्द येथील बाबर देशमुख आणि नदीम देशमुख व समस्त गावकरी मंडळींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी खास औरंगाबाद वरून आलेल्या कवल शाकीर जाकिर गुलाम चिस्ती यांच्या टीमने भरदार कार्यक्रम सादर करून मेरा खुर्द आणि परिसरातील रसिकांचे मन जिंकले. कार्यक्रम हा वेळेवर सुरू झाल्यामुळे परिसरातले भरपूर मंडळी या कार्यक्रमासाठी जमली होती.
सुप्रसिद्ध कवी लेखक अजीम नवाज राही यांच्या बहरदार सूत्रसंचालनामुळे मेरा आणि परिसरातील रसिकांनी मनमुराद आनंद घेतला. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ओबीसी सेलचे सुभाषभाऊ देव्हडे, अंढेरा पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे, मेरा बुद्रुकचे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव पडघान, माजी पंचायत समिती सदस्यपती सत्तार पटेल, मेरा चिखली तालुका राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष गजानन वायाळ, प्रथम नागरिक सरपंचपती नंदकिशोर घोडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील गवई, मेरा खुर्द येथील प्रतिष्ठित नागरिक अरुण वराडे, दीपक शिंगणे, अशोकभाऊ सुरडकर, बाबर देशमुख, सांडू शहा, अखिल शेख, सरपंच भागवत पाटील, विशाल पाटील, गोविंद सुसर, महेंद्र वाघमोडे, नंदू वराडे यांच्यासह मेरा सर्कलचे सर्व पत्रकार बंधू कार्यक्रमासाठी उपस्थित होते.