आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : भागवत धर्म प्रसारक समिती, पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव समाजोन्नती परिषद, श्री नामदेव दरबार कमिटी, घुमान आणि श्री संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर यांच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान ही २३०० किलोमीटरची सायकल यात्रा ४ नोव्हेंबर रोजी सुरू होऊन आळंदीत ( दि. ६ ) रोजी प्रवेशली. या रथ व सायकल वारीचे भक्तीमय वातावरणात स्वागत आळंदीकरांचे वतीने करण्यात आले.
प्रदक्षिणा मार्गावरून सायकल वारीचे माऊली मंदिरात आगमन झाले. यावेळी संत नामदेव महाराज यांच्या पादुकांचे माऊलीच्या समाधी जवळ पुजन करण्यात आले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, पालखी सोहळा मालक बाळासाहेब पवार,पालखी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुर्यकांत भिसे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, भाजप आध्यात्मिक आघाडीचे संजय घुंडरे, विलास काटे, विठ्ठल शिंदे, हभप पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, सुदिप गरुड, संदीप नाईकरे, शिरीष कारेकर,ज्ञानेश्वर गुळंजकर,अरुण बडगुजर, जनार्दन पितळे, तुकाराम माने, वारकरी संप्रदायाचे विद्यार्थी आणि आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते. प्रकाश पानसरे यांनी स्वागत केले.
श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान सायकल यात्रेचा मार्ग श्री क्षेत्रपंढरपूर, फलटण, सासवड, पुणे, आळंदी, देहू, नाशिक, त्र्यंबकेश्वर मार्गे ही सायकल वारी महाराष्ट्रासह, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब या राज्यातून अमृतसर मार्गे घुमान असा २३०० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. सोबत संत नामदेव महाराज आणि गुरु गोविंदसिंह यांचा ग्रंथ, पादुका, भागवत धर्माची पताका आणि पालखी रथ आहे. कार्तिक शु्द्ध एकादशी संत नामदेव महाराज यांची ७५२ वी जयंती, संत ज्ञानेश्वर माऊलींचा ७२५ वा संजीवन समाधी सोहळा आणि गुरुनानक जयंती याचं औचित्य साधून संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर इथल्या जन्मस्थानावरुन या यात्रेस सुरुवात करण्यात आली. या सायकल यात्रेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सायकल रायडिंग केलेल्या आणि ५० पेक्षा अधिक वयोमान असलेल्या सुमारे ११० सायकल पटूंनी सहभाग घेतला आहे. या यात्रे द्वारे भागवत धर्माच्या शांती, समता आणि बंधूता या विचारांचा प्रसार करण्यात येत आहे.