आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील संत श्री रघुनाथ बाबा यांच्या १३ व्या पुण्यस्मरण दीना निमित्त आयोजित तपपूर्ती सोहळ्यात श्री कार्तिक स्वामीचा जन्मोत्सव, त्रिपुरी पोर्णिमेचे पुर्वसंधेला औचित्य साधून ह. भ.प. प्रज्ञाचक्षू प.पु. मुकुंदकाका जाटदेवळेकर यांचे संकल्पनेतून सोमवारी ( दि.७ ) माऊलींचे संजीवन समाधी मंदिर, पवित्र इंद्रायणी नदीचे दुतर्फ़ा तिरावर एक लक्ष दिप उजळवून दीपोत्सव करण्यात आला. या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविकांनी दीपोत्सवात सहभाग घेतला. श्रींची आरती,इंद्रायणी मातेची आरती तसेच दीपोत्सव हरिनाम गजरात झाले. यावेळी इंद्रायणी नदी घाट दुतर्फ़ा उजळून निघाला. यावेळी एक लक्ष दिवे समर्पण करण्यात आले.
या दीपोत्सवास श्री राम मंदिर न्यासाचे खजिनदार प.पु. गोविंद देवगीरीजी, मुकंदकाका जाटदेवळेकर , प.पु. स्वामी ज्ञानानंद सरस्वती, शांतीब्रम्ह मारुती महाराज कुरेकर, डॉ. नारायण महाराज जाधव, प.पु. डॉ. विश्वनाथ कराड, प.पु. शरद महाराज जोशी, प.पु. साखरे महाराज, प.पु. वेदमूर्ती फाडाजे गुरुजी, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, बाळासाहेब चोपदार, समय गिरी महाराज, बालानंद महाराज सरस्वती, रघुनाथ बाबा मठाचे कल्याण महाराज कल्याणकर आदी संतजण यांचेसह वारकरी,भाविक,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी हजारो दिव्यांची इंद्रायणी नदी किनारा दिव्यांचे प्रकाशाने उजळून निघाला. दीपोत्सवास ह.भ.प. प्रज्ञाचक्षू प.पु. मुकुंदकाका जाटदेवळेकर, ह.भ.प. प.पु. गोविंद महाराज जाटदेवळेकर, विज्ञानेश्वर भक्त परिवार यांनी यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी येथील विविध शाळांमधील शालेय मुले, नागरिक, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, नेचर फाउंडेशन परिवाराचे भागवत काटकर, भक्त परिवार यांनी दीपोत्सवास प्रत्येक्ष सहभाग घेतला. कमी वेळेत इंद्रायणी नदीचे दुतर्फा किनारा दीपोत्सवात उजळून निघाला.