Breaking newsHead linesKOLHAPURPachhim MaharashtraWorld update

कोल्हापुरात पुढील ३१ तांस इंटरनेट बंद!

– आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने दोन धर्मियांत तेढ; पोलिस, प्रशासनाकडून शांततेचे आवाहन

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी) – कोल्हापुरातील तणावाची परिस्थिती लक्षात घेता, पुढचे ३१ तास इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून, राज्याच्या गृह विभागाच्या सचिवांनी इंटरनेट बंद करायला परवानगी दिली आहे, यामुळे ८ तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे कथितरित्या उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवल्याच्या आरोपावरून कोल्हापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, दंगलसदृश परिस्थिती आहे. शहरात सद्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.

मंगळवार (६ जून) सायंकाळपासून कोल्हापुरात धार्मिक तेढ निर्माण झालेली असून, काही ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या. काही संघटनांनी यावरून कोल्हापूर बंदचीही हाक दिली. यादरम्यान हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. तसेच, अश्रुधूराच्या नळकांड्याही काही ठिकाणी फोडण्यात आल्या. या प्रकरणात पोलिसांनी स्टेटस ठेवल्याच्या आरोपांवरून ६ जणांना अटक केली आहे. दरम्यान, ‘कोल्हापुरात सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, कोणीही कायदा सुव्यवस्था खराब होईल असे काही करू नये, कोणीही कायदा हातात घेऊ नये, कायदा हातात घेतल्यावर कारवाई होणार. कायदा हातात घेण्याचे समर्थन केले जाणार नाही. औरंगजेबाचे उदात्तीकरण कोणीही करू नये’, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. तर कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले की, मंगळवारी औरंगजेबाची स्तुती करणारी एक पोस्ट व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल झाली होती. याच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी बुधवारी कोल्हापूर बंदची घोषणा केली होती. तसेच, संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. कोल्हापूर शहरात सध्या शांतता आहे. मात्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. शहरातील इंटरनेट बंद करण्यात आले आहे. सोशल मीडियावरवरील पोस्टवर दुर्लक्ष करा, असे आवाहनही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केलेले आहे. तर, परिस्थिती शांत राहण्यासाठी आम्ही वाटेल ते करु. कोल्हापूरचा इतिहास समतेचा आहे. सर्वधर्म समभावाचा आहे. याचे उदाहरण आपण सर्व जगाला दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराजांची ही धरती आहे, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगून, शांततेचे आवाहन केले.

दरम्यान, कोल्हापुरातील दुकाने आज बंद ठेवण्यात आली होती. हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनामुळे कोल्हापूरमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या हिंदुत्ववादी संघटनांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. पण आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी कोल्हापुरात ठिकठिकाणी मोठी गर्दी करत आंदोलन केले. याच आंदोलनादरम्यान, मटण मार्वेâट परिसरात दगडफेकीची घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. दगडफेकप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या आंदोनानंतर कोल्हापुरातील इंटरनेट सेवा उद्या संध्याकाळपर्यंत बंद करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला. यावेळी पोलिसांनी कोणत्याही अफवांना बळी पडून नका. दगडफेक करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच, जमावबंदीचे उल्लंघन करणार्‍यांवरदेखील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!