बुलढाणा लोकसभेची जागा शेट्टींनी तुपकरांसाठी सोडली; तुपकरांच्या डोक्यात ‘कमळ’ की ‘मशाल’?
– अजित पवार गटालाही शिंदे गटाइतक्याच जागा हव्यात!
कोल्हापूर/मुंबई (प्राची कुलकर्णी) – बुलढाणा लोकसभा मतदारसंघासह राज्यातील सहा लोकसभा मतदारसंघात स्वबळावर लढणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज कोल्हापुरातून जाहीर केले आहे. हातकणंगले मतदारसंघातून स्वतः शेट्टी तर बुलढाण्यातून शेतकरी नेते रविकांत तुपकर हे लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. एकीकडे तुपकरांसाठी शेट्टी हे बुलढाण्याची जागा जाहीर करत असले तरी, तुपकरांचे अद्याप कमळ हाती घेणार की मशाल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तुपकरांबाबत भाजप नेतृत्वाला आशा होती. परंतु, त्यांची व उद्धव ठाकरे यांची बैठक झाल्यानंतर भाजप नेतृत्वाने तुपकरांबाबत सावध भूमिका घेतली आहे. स्वतः तुपकर हे जोपर्यंत भाजप नेतृत्वाशी चर्चा करत नाही, तोपर्यंत तुपकरांना निमंत्रण द्यायचे नाही, असे भाजपच्या पातळीवर निश्चित झाले असल्याची माहिती आहे. दरम्यान, तुपकर हे स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर लढणार असले तरी त्यांना एखाद्या राजकीय पक्षाचा सपोर्ट लागणार आहे. हा राजकीय सपोर्ट तुपकरांना कोण देतो, याकडे राजकीय वर्तुळाचा नजरा लागलेल्या आहेत.
स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यात सहा जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. ते स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. शेट्टी यांनी स्वबळाचा नारा देताना महायुती आणि महाआघाडीचा अनुभव वाईट असल्याचे सांगितले. लोकसभेच्या जागावाटप चर्चेमध्ये आम्हाला फारसा रस नाही, असे सांगून, त्यांनी सहा जागांवर लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती दिली. शेट्टी यांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. मतांची ही फूट भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, महायुतीतदेखील जागा वाटपावरून जोरदार धुसफूस सुरू आहे. अजित पवार गटाने भाजपकडे शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच जागा देण्याची मागणी केली आहे. यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्या भाजप नेते देवेंद्र फडणवीसांपुढे वेगळाच पेच निर्माण झाला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाने जागांच्या समसमान वाटपाच्या फॉर्म्युलाचा आग्रह धरला आहे. विशेषतः मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः कॅमेर्यापुढे असा दावा केला आहे. लोकसभाच नव्हे तर विधानसभेलाही आम्हाला शिंदे गटासारख्याच जागा मिळाव्यात, असे भुजबळांनी ठणकावून सांगितलेले आहे.
कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना महाआघाडीची डोकेदुखी वाढवणारे विधान केले. राजू शेट्टी म्हणाले की, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलढाणा, परभणी या सहा जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढवणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार असतानाच स्वाभिमानी बाहेर पडली. त्यानंतर आणि आताही आम्ही का बाहेर पडलो, याची विचारणा कोणीच केली नाही. महाविकास आघाडीच्या धोरणावर आक्षेप ठेवून बाहेर पडल्यानंतर महाविकास आघाडीने त्यावर काहीच स्पष्टीकरण दिले नाही, असे शेट्टी यांनी स्पष्ट करून स्वबळाचा नारा दिल्याने त्याचा फटका अर्थातच महाआघाडीला बसणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
मत विभागणी आणि संवेदनशील विषयात लोकांची डोकी भडकवायची ही भाजपची रणनीती आहे. मत विभागणी करणे भाजपला चांगले जमले आहे. भाजपची मते वाढलेली नाहीत पण विरोधी मतांमध्ये फूट पाडण्यात ते यशस्वी झाले आहेत. केंद्र सरकारच्या कारभाराला महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनता कंटाळलेली आहे. देशात आतापर्यंत १४ पंतप्रधानांनी जे कर्ज केले नाही, त्याच्या चौपट कर्ज एका पंतप्रधानाने दहा वर्षात केले आहे. आता फक्त मोदींना विरोध करून चालणार नाही तर तुम्ही जनतेसाठी काय करणार आहात, तेही सांगावे लागणार आहे. भ्रष्टाचार, शिक्षण आणि शेती याविषयी तुमचे धोरण काय हे सांगावे लागणार आहे, असे राजू शेट्टी यांनी आघाडीच्या पक्षासंदर्भात म्हटले आहे.