आपल्या भारतीय संस्कृतीत निसर्गाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. निसर्गाशी माणसाचे अतिशय जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. प्राचीन काळापासून भारतीय माणूस वनस्पती, प्राणी आणि पशुपक्षी यांच्याशी आपले अतिशय आपुलकीचे स्नेहसंबंध जोपासत आला आहे. भारतीय सण उत्सव याची साक्ष देतात. या सजीव सृष्टीचे पडसाद साहित्यातही उमटणे अपरिहार्य आहे. वैदिक, मध्ययुगीन आणि आधुनिक साहित्यातही वनस्पती, प्राणी आणि पशुपक्षाचे उल्लेख आढळून येतात. बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथील निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराज यांच्या ‘अनुभूति’ ग्रंथात असंख्य ठिकाणी पर्यावरणाचे दर्शन घडते.
शुकदास महाराजांना निसर्गाची प्रचंड ओढ आहे. निसर्गाशी आपले अतूट नाते महाराज जोडू पाहतात. निसर्गाविषयीचे महाराजश्रींचे निरीक्षण अतिशय सूक्ष्म आहे. निसर्गाच्या सानिध्यात महाराज रमून जातात. लोणार येथील जगप्रसिद्ध खार्या पाण्याच्या सरोवर परिसरात काही दिवस महाराजांचे वास्तव्य होते. विवेकानंद आश्रम परिसर तर निसर्गाने फुलून गेलेला आढळून येतो. आता तर शिवालय परिसरात निसर्गप्रेमींची प्रचंड गर्दी उसळताना दिसते. उंच उंच बॉटल पाम वृक्ष तर कर्मयोगी संत शुकदास महाराजश्रींची आणि महाराजांच्या विवेकानंद आश्रमाची ओळख करून देण्यासाठी वर्षानुवर्ष सज्ज आहेत. आजतागायत निसर्गाचा चमत्कार हा सगळ्यांनाच भारावून टाकत आला आहे. निसर्गाची किमया काही औरच असते. आपल्या ‘अनुभूति’ ग्रंथातील ४३९ क्रमांकाच्या अभंगात कर्मयोगी संत शुकदास महाराज म्हणतात,
खाता फळ पक्षी, बीजही गिळती। नेऊन टाकती, वृक्षावर।।
काट सेवरीचे, खोडही काटेरी। चढू नये वरी, म्हणूनिया।।
कमळा सारखी, फुले आकर्षक । बियासी भक्षक, नसे कोणी।।
भर उन्हाळ्यात, दोड्या फुटल्याने । बिजास उडणे, शक्य होते।।
शुकदास म्हणे, जातो चक्रावून। घटना पाहून, निसर्गाच्या।।
पक्षी फळ खातात. फळाबरोबरच फळातील बी त्यांच्या खाण्यात जाते. पक्षी हे वृक्षावर जाऊन बसतात. वृक्षावर ते बी टाकतात. काटसेवरीच्या खोडाला ही काटे असतात. जणू काही कोणी झाडावर चढू नये म्हणूनच ते काटे असतात. कमळाची फुले अतिशय सुंदर व आकर्षक असतात, म्हणून काय कोणी कमळाच्या बिया खात बसत नाही. भर उन्हाळ्यात फुलातून बी निघते व ते उडते. शुकदास महाराज म्हणतात, ह्या अशा प्रकारच्या निसर्गातील असंख्य प्रकारच्या घटना पाहून मी अक्षरशः चक्रावून जातो. निसर्गाचे चक्र निसर्गच कशा पद्धतीने चालवितो खरोखर पाहण्याजोगे आणि अनुभवण्याजोगे आहे. ‘झाडे लावा झाडे जगवा’ असे आपल्याला म्हणावे लागते. तरीसुद्धा झाडे कशी फोटो पुरतीच मर्यादित राहतात. याचा परिचय सर्वांना आहे. येथे काटसेवरीचे झाड महाराजश्रींचे लक्ष वेधून घेते. काटसेवरीच्या झाडावर कोणालाही चढता येऊ नये म्हणूनच की काय त्याच्या खोडालाही काटे असतात. अशी महाराजश्री अतिशय सुंदर कल्पना करतात. यातच वृक्षांचे जतन व संवर्धनाचे दर्शन घडते. फुलातील बी मात्र कुणी खात बसत नाही. असे असले तरी ते स्वतःहून उडून जाते. अशा नैसर्गिक घटना कर्मामुळे शुकदास महाराज म्हणतात, मी चक्रावून गेलो आहे.
‘अनुभूति’तील ४२७ क्रमांकाच्या आणखी एका अभंगात हाच आशय आढळून येतो. शुकदास महाराज म्हणतात,
जिकडे पाहतो, तिकडे दिसतो ।अनुभवा येतो, चमत्कार।।
किडे कीटकांचे, पक्ष्यांचे प्रकार। निर्मिल्या अपार, वृक्षवेली।।
विविध पशूंच्या, निर्मिती सोबत। मानवाला त्यात, पाठविले।।
शुकदास म्हणे, तूचि करणारा। खेळ बघणारा, देखील तू।।
वरील अभंगात वनस्पती, प्राणी (अतिसूक्ष्म जीवापासून) आणि पशुपक्षी या सजीव सृष्टीचे दर्शन घडते. जिकडे नजर जाईल तिकडे अदभूत अशा प्रकारचा चमत्कार दिसतो. हा चमत्कार फक्त दिसत नाही तर अनुभवास येतो. महाराजश्रीं म्हणतात, हे परमेश्वरा! तू या पृथ्वीतलावर किती किडे कीटकांचे प्रकार जन्माला घातलेस. त्यात पक्षाचे प्रकार किती असंख्य आहेत. एवढेच नाही तर अगणित अशा वृक्ष वेली तू निर्मिलेल्या आहेत. त्याचबरोबर असंख्य प्राण्यांचीही निर्मिती तू केलीस. इतर प्राण्याबरोबर मानवालाही तूच या भूतलावर पाठविले आहे. शुकदास महाराज म्हणतात, हे परमेश्वरा! ही सृष्टी निर्माण करणाराही तूच आहेस. आणि त्यांचा खेळ पाहणारही तूच आहेस.
वनस्पती प्राणी आणि पशुपक्षी यांच्या निर्मितीचे श्रेय इतर संतांप्रमाणे महाराजश्रीं परमेश्वराला देताना दिसतात. यातूनच निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराजश्रींच्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते. आज जागतिक पातळीवर पर्यावरण जनजागृतीचे वारे वाहू लागले आहेत. हा विचार लक्षात घेता महाराजश्रींचा अध्यात्म आणि विज्ञानाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर अलीकडील काळातील निसर्गाचा कोप लक्षात घेता, महाराजश्रींचे पर्यावरणविषयक विचार अतिशय महत्त्वाचे ठरतात.
(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व व्याख्याते असून, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहेत. मो.नं.९९२३१६४३९३)