बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) :- जिल्ह्यात बनावट वाहन नोंदणी करणार मोठं रॅकेट सक्रिय असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आतापर्यंत 34 वाहनांची बनावट नोंदणी केल्याचं उघड झाल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर परिवहन अधिकाऱ्यांनी 19 ऑक्टोबर रोजी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या चौकशीतून अजूनही काही बनावट नोंदणी केलेल्या वाहनांचा शोध घेण्यात येत आहे.
आरोपींची शक्कल, बनावट नोंदणीसाठी ट्रॅक्टरसाठी राखीव ठेवलेली सीरिज वापरली
बनावट नोंदणी करण्यासाठी आरोपींनी बुलढाणा जिल्ह्यातील नवीन ट्रॅक्टरसाठी राखीव ठेवलेली सीरिज वापरल्याने यात परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याची दाट शक्यता असल्याचं तपासात समोर आलं आहे. यातील काही आरोपी हे नागपूर शहरातील असून यापूर्वीही त्यांनी अशाप्रकारच्या नोंदणी केल्यामुळे नंदुरबार पोलीसात त्यांच्यावर गुन्हाची नोंद आहे. या प्रकरणी बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणाचा खरा सूत्रधार अजूनही बाहेर असल्याने परिवहन विभागाची चिंता वाढली आहे.
आरोपींनी नागपुरातील वाहनांची केली नोंद
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील अर्षद खान आणि सुभाष मनाल या दोन आरोपींना बुलढाणा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोन्ही आरोपींच्या चौकशीतून नागपूर इथून आणलेली अनेक वाहने बुलढाणा आणि नंदुरबार इथे नोंदणी करुन विकल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूर येथील काही डीलर आता रडारवर
बनावट वाहन नोंदणी प्रकरणात बुलढाणा पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये असून नागपुरातील काही वाहन डीलर पोलिसांच्या रडारवर आहेत. 34 पैकी 17 वाहने पोलिसांनी आतापर्यंत जप्त केली आहेत तर अजूनही अनेक वाहनांचा शोध पोलीस घेऊ शकले नाहीत. यात काही वाहने पश्चिम बंगालमधून आणली आहेत. त्यामुळे आगामी काळात बनावट वाहन नोंदणी करणार मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.