चिखली (विशेष प्रतिनिधी) – बाळासाहेबांची शिवसेना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट) या पक्षाचे सिंदखेडराजा युवा तालुका प्रमुख संदीप मगर यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, त्यांच्या प्रयत्नामुळेच साखरखेर्डा येथे बंद पडलेल्या दोन रोहित्र संच (डीपी) च्या जागी नवीन दोन संच आले आहेत. त्यामुळे गावातील वीजेची समस्या निकाली निघाल्याने गावकर्यांनी मगर यांना धन्यवाद दिले आहेत. विशेष म्हणजे, याप्रकरणी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने यापूर्वी वृत्तही प्रसारित केले होते.
सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि लवकरच नगरपालिका होण्याच्या मार्गावर असणार्या गावांमध्ये लाईनीच्या बाबतीत उदासीनता दिसून येत आहे. गावातील वीज पुरवठा वेळोवेळी बंद होणे, डीपी जळणे, व नवीन डीपी लवकर न येणे, लोकांना अंधाराचा सामना करावा लागणे, त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे. याबाबत महावितरण कंपनीला कोणतेही सोयरसुतक नाही. साखरखेर्डा येथील तीन डीपी संच बंद होते, पैकी एक संच बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे सिंदखेडराजा यु्वा तालुकाप्रमुख संदीप मगर यांच्या प्रयत्नामुळे बारा तासात आणला गेला होता.
परंतु बाकी दोन संच आजपर्यंत बंदच होते. मगर यांच्या प्रयत्नाने गणपती मंदिराजवळील डीपी बारा तासांत सुरू झाली होती, बातमी ब्रेकिंग महाराष्ट्रने राज्यभरात प्रसारित केली होती. त्याचवेळी एक विद्युत संच चालू केला, इतर दोन डीपी संच कधी चालू करणार, याबाबत प्रश्नदेखील विचारला होता. त्याचीही सकारात्मकतेने संदीप मगर व त्यांच्या सहकार्यांनी दखल घेऊन, उर्वरित दोन डीपी संचही नवे मिळवले आहेत. त्यांनी गावातील राजपूत कॉलनी व खालचे बस स्टॅन्ड येथील दोन्ही ट्रांसफार्मरचा पाठपुरावा करून गावांमध्ये लावून घेत, वीज पुरवठा सुरळीत केला आहे. साखरखेर्डा येथील खालचे बस स्टॅन्ड, राजपूत कॉलनी, शिक्षक कॉलनी यांची दिवाळी अंधारात जाऊ नये, म्हणून संदीप मगर यांनी खूप परिश्रम घेऊन गावातील त्यांनी तिन्ही विद्युत संच चालू करून घेतले आहेत. त्यामुळे त्यांचे साखरखेर्डात येथे कौतुक होत आहे.