– सोयाबीन काढणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ
लोणार (विनोद पाटील तेजनकर) – मेहकर व लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत होता. या पावसाने सोयाबीन काढणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती. उरलेल्या सोयाबीन पिकाची या पावसाने नासाडी केली असून, शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे.
दुपारपासून या दोन तालुक्यांना पावसाने झोडपणे सुरू केले आहे. मेहकर, दुधा, ब्रम्हपुरी, जानेफळ, रायपूर, या परिसरासह वडगाव तेजन, किनगाव जट्टू, बिबी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत होता. या अगोदर झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे .काही शेतकऱ्यांची सोयाबीन उभी आहे, शेतामध्ये पाणी साचल्याने सोयाबीन काढावी तर कशी, या चिंतेत शेतकरी आहे. तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन सोगून गंजी घातली असता, त्या गंजीमध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे बळीराजा हा खूप चिंतेत आहे. काही दिवसांवर दिवाळी हा सण आलेला आहे, परंतु दिवाळी हा सण शेतकऱ्यांसाठी संकटाचा जाणार आहे. तरी शासनाने लवकरात लवकर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत देऊन शेतकऱ्यावरील संकट दूर करावे , अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.